Wednesday, 6 March 2019

गर्भगिरीत पहाटेच्या अंधारात घुमला ‘हर हर महादेव’चा जयघोष


नगर । प्रतिनिधी - नगरजवळील मांजरसुंभा येथील गोरक्षनाथ गडावर महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील हजारो युवकांनी प्रवरासंगम येथून कावडीने पायी चालत गंगाजल आणून पहाटेच्या सुमारास गड चढण्यास सुरुवात करून हर हर महादेव, ओम शिव गोरक्षचा जयघोष केला व पहाटेच्या अंधारात गर्भगिरीचा डोंगर जयघोषाने दुमदुमला. सूर्योदयाला देवाला गंगाजलाने अभिषेक करण्यास सुरुवात झाली 
कात्रड, गुंजाळे, विळद, देहरे,वांबोरी, माजरसुंभा, डोंगरगण, पाची महादेव वस्ती, आढाववाडी, नांदगाव शिंगवे, पिंपळगाव माळवी आदी परिसरातील हजारो युवक कावडी घेऊन दोन दिवसांपूर्वीच प्रवरासंगम येथे गंगाजल आणण्यास पायी गेले होते. रात्री ते गडाच्या पायथ्याला पोहचले व पहाटे त्यांनी अभिषेक केला. गंगाजलाने अभिषेक झाल्यावर सकाळी 8 वा दुग्धाभिषेक, महापूजा करण्यात आली. यावेळी अध्यक्ष  शंकरराव कदम, सचिव गोरक्षनाथ कदम, उपाध्यक्ष जयराम कदम यांच्यासह विश्वस्त, भाविक, नाथभक्त व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते  
सकाळी सात वाजल्यापासूनच नाथभक्तांनी दूध, केळी, साबुदाणा खिचडी प्रसादवाटप सुरु केले. ते संध्याकाळपर्यंत चालू होते. श्रीगोंदा तालुक्यातील एक पायी दिंडी सकाळी आली. उत्सवानिमित्त मंदिराला लायटिंग व फुलाची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. दिवसभर सुमारे 40 हजार भाविक दर्शनाला आले होते, मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात  आले आहे. 
गोरक्षनाथ गडावर 4 उत्सव साजरे केले जातात. त्यातील एक महाशिवरात्र आहे. तसेच दर एकादशी, पौर्णिमा व अमावास्येला येथे भाविकांची गर्दी असते. वर्षभर भाविक व पर्यटक या ठिकाणी रोज येत असतात. येथील स्मृती मंदिराचे काम पूर्ण होत आले आहे.

No comments:

Post a Comment