नगर । प्रतिनिधी -
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 27 व्या स्मृतीदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशनतर्फे आयोजित व शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन प्रायोजित खुल्या समूह भक्तीगीत स्पर्धेत मोठ्या गटात भक्ती मंडळ (शिरूर) व वर्धमान अभिनंदन ग्रुप यांनी संयुक्तपणे प्रथम तर छोट्या गटात कृष्णा बाल भजन मंडळ व उज्वलनगर ग्रुपने संयुक्त विजेतेपद पटकावले. जुन्या बसस्थानकाजवळील उज्वल कॉम्प्लेक्स येथील उज्वलनगर जैन धर्मस्थानक परिसरात झालेल्या या स्पर्धेचे पारितोषिक वितरण उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रमोद गांधी (पीटू), गौरव भंडारी, बालगायक चैतन्य देवढे, खुशबू जैन, जैन सोशल फेडरेशनचे सुरेश कटारिया, संतोष गांधी, सरोज कटारिया, तनुजा भंडारी, सीमा मुनोत, सपना कटारिया, परीक्षक संजय हिंगणे यांच्यासह जैन सोशल फेडरेशनचे सदस्य, ब्राम्ही युवती मंचच्या सदस्या उपस्थित होत्या.
यावेळी पूज्य अर्चनाश्रीजी, पूज्य उदयप्रभाजी, पूज्य चंदनाजी, पूज्य विपुलदर्शनाजी, पूज्य दिव्य दर्शनाजी, पूज्य पावनदर्शनाजी, पूज्य सुरभीश्रीजी आदी साध्वीजी उपस्थित होत्या.
नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त 15 वर्षांपासून ही स्पर्धा होत आहे. आज समाजाला थोरामोठ्यांच्या विचारांची गरज आहे. आपल्या भक्तीसंगीतात सकारात्मक ऊर्जा देण्याची ताकद आहे. या ठिकाणी स्पर्धकांनी सादर केलेली गीते खरोखर तल्लीन करणारी होती. अतिशय मनस्वी आनंद या गीतांनी दिला. अशा स्पर्धेसाठी योगदान देता येणे ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. दरवर्षी स्पर्धेला वाढता प्रतिसाद मिळत आहे. येणार्या काळात भक्तीचा हा जागर राज्यस्तरीय करावा. आचार्यश्रींना स्वतःला भक्तीगीत-संगीताची आवड होती. त्यांच्या विचारांनुसारच स्पर्धा सातत्याने होत आहे.
दोन दिवस झालेल्या या स्पर्धेत लहान व मोठ्या गटात मिळून 64 संघांनी सहभाग नोंदवला. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनीच अतिशय सुंदर भक्तीगीते सादर करून भाविकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोज कटारिया यांनी केले. आभार संतोष गांधी यांनी मानले. स्पर्धेसाठी जैन सोशल फेडरेशनच्या सर्व महिला, पुरूष सदस्यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून राजश्री इनामदार व संजय हिंगणे यांनी काम पाहिले.
No comments:
Post a Comment