Monday, 18 March 2019

आयात केलेला उमेदवार नकोच, कार्यकर्त्यांची इच्छा!


नगर । प्रतिनिधी - राजकारण म्हटलं की, पक्षबदल आलाच. असेच काहीसे गणित आता राजकीय पक्षांमध्ये तयार झाले आहे. एखाद्या पक्षाने तिकीट नाकारले की लगेच दुसर्‍या पक्षात  प्रवेश करुन आपले नशीब अजमावण्याचे प्रकार हल्ली वाढत चालले असल्याचे चित्र आहे. प्रवेश होताच आपल्याला तिकीट कसे मिळेल यासाठी फिल्डींग लावली जाते. मात्र, या अशा पक्षप्रवेशाला कार्यकर्ते चांगलेच कंटाळलेले दिसत असून आता सर्वच पक्षाचे कार्यकर्ते हे इतर पक्षातील नेता नको तर आमच्या पक्षातील जुन्याजाणत्या आणि पक्षनिष्ठा असलेल्या कार्यकर्त्यालाच तिकीट द्यावे अशी मागणी होताना दिसत आहे. यातून ‘आयात’ नको तर निष्ठावान कार्यकर्त्याला संधी द्या असाच काहीसा सूर आळवला जात आहे.
सध्या राजकीय पक्षातील नेते चांगलेच कामाला लागले असून नगर दक्षिणेत कुणाला तिकीट निश्चित होणार याची गणिते आखली जात आहेत. नगर दक्षिणसाठी काही नेत्यांची नावे चर्चेत येत असताना आयात केलेला उमेदवार नको अशी ठाम भूमिका मांडली जात  आहे. जो पक्ष ‘आयात’ केलेला उमेदवार देईल त्याची निश्चितच पंचाईत होणार आहे. सध्या राजकीय वातावरणात पक्षबदलाचे वारे वाहत असल्याने पक्षाची  विचारधारा मान्य होणार का ?  हा प्रश्नच आहे. जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा वेगळ्या वळणावर पोहोचले असून भविष्यात हे वळण कोठे जाणार? हे आताच सांगणे कठीण झाले आहे. राजकीय वस्तुस्थिती पाहता विचारांचे कार्यकर्ते आणि प्रचारासाठीचे कार्यकर्ते असे दोन भाग पक्षात पडणार आहेत हे मात्र निश्चित. राजकारणात कोणी कोणाचा जास्त दिवस मित्र नसतो व जास्त दिवस शत्रू नसतो. आपण ऐकले होते मात्र हा अनुभव आपल्याला आपल्याच जिल्ह्यात येताना दिसत आहे. 
सध्या देशाच्या राजकारणात जिल्ह्याचे नाव चांगलेच गाजत आहे. त्यातच राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ.सुजय  यांनी भाजपात प्रवेश करुन आपल्याला उमेदवारी मिळणार या विश्वासाने कामाला सुरुवात केली आहे. परंतु,  दुसर्‍या बाजूला आता खा. गांधी हे देखील दुपटीने सक्रिय झाले असून कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी रणनीती आखली जात आहे. वास्तविक पाहता विखे आणि गांधी यांनी एकमेकांवर चांगलीच टीका केली होती. तसेच विखे यांनी भाजप प्रवेशाआधी भाजपवर केलेल्या टीकेची व्हिडीओ क्लिप व्हारयल होत असून एकप्रकारे विखे यांना खिंडीत गाठण्याचा प्रकार सुुरु झाला आहे. दुसर्‍या बाजूला विखे यांची उमेदवारी  भारतीय जनता पार्टीमधून जवळपास निश्चित करण्यात आली असे मानले जात आहे.  यावर  आता  भारतीय  जनता  पार्टीचे खासदार दिलीप  गांधी  हे  देखील आपल्यालाच उमेदवारी  मिळावी यासाठी दबाव निर्माण करुन कामाला लागले आहेत. 
यावर आता नगर दक्षिणचा तिढा कधी सुटणार आणि कोण  उमेदवार असणार याकडे आता राजकीय पक्षांसह मतदारसंघातील सर्व रहिवाशांचे लक्ष वेधलेले दिसत आहे. राज्याच्या राजकारणानेही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची खास दखल घेतल्याचे चित्र आहे.त्यामुळे या वेळेची निवडणूक ही निश्चितच रंगतदार होणार असून कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे दिसत आहे.

No comments:

Post a Comment