Saturday, 2 March 2019

‘दिल ये जिद्दी है’ ः महिलांच्या जिद्दीला सलाम करणारी अनोखी फोटो स्पर्धा


नगर । प्रतिनिधी - राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, डॉ.आनंदी गोपाळ, मदर तेरेसा, कल्पना चावला, मेरी कोम अशा अनेक थोर महिलांनी आपल्या कर्तृत्वाने स्त्रीशक्तीची प्रचिती आपल्या कार्यातून दिली आहे. या महान कार्य करणार्‍या सर्व महिलांमध्ये एक गोष्ट समान होती ती म्हणजे त्यांची जिद्द. अशीच जिद्द सर्वच युवती, महिलांमध्ये असते. त्यामुळेच त्या स्वत:बरोबरच कुटुंबाचाही उत्कर्ष साधतात. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांमधील याच जिद्दीला सलाम करण्यासाठी नगरमधील सरस्वती हॉस्पिटल व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने दिल ये जिद्दी है या आगळ्यावेगळ्या फोटो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात युवती, महिलांनी आपल्या स्वत:चा फोटो व त्याजोडीला स्वत:च्या मनात असलेली एखाद्या गोष्टीबाबतची जिद्द शब्दबध्द करून सादर करायची आहे. उत्कृष्ट फोटो व जिद्दीला पारितोषिक रुपाने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती सरस्वती हॉस्पिटलचे संचालक डॉ.अमोल जाधव व डॉ.प्राजक्ता जाधव यांनी दिली.
जीवनात यशस्वी व्हायचे असेल, ध्येय गाठायचे असेल तर प्रचंड ध्यास, ध्येयासक्ती व जिद्द महत्त्वाची असते. इतिहासकाळापासून आपल्या देशातील महिलांनी अशी जिद्द आपल्या कार्यातून दाखवली आहे. प्रत्येक महिलेत अशी जिद्द असतेच. युवतींना चांगल्या करियरची, देशासाठी काही तरी करण्याची जिद्द असू शकते. अगदी गृहिणींमध्येही कुटुंबाला उत्कर्षाच्या शिखरावर नेण्याची जिद्द असू शकते. आपल्या मुलाबाळांना एखाद्या क्षेत्रात कर्तृत्त्ववान, कर्तबगार करण्याची जिद्दही असू शकते. त्यासाठी त्या कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडून सतत प्रयत्न करीत असतात. 
सरस्वती हॉस्पिटलने आरोग्यसंपन्न समाजाचा ध्यास घेताना महिलांच्या सर्वांगीण विकासाचाही ध्यास घेतला आहे. यातूनच हॉस्पिटलने नुकताच नगरमध्ये गरोदर महिलांचा आगळावेगळा फॅशन शो घेतला. या कार्यक्रमातून गरोदर मातांचे भावविश्व उलगडून दाखविण्यात आले. महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्यही उत्तम असले पाहिजे. तरच त्या त्यांच्यातील प्रचंड ऊर्जा, काही तरी वेगळे करण्याची जिद्द प्रत्यक्ष उतरवू शकतील. यासाठी सरस्वती हॉस्पिटल सातत्याने नवनवीन संकल्पना राबवून महिलांना त्यात सहभागी करून घेत आहे. अशा उपक्रमातून महिलांना मिळणारा आनंद, त्यांच्या चेहर्‍यावरचे समाधान लाखमोलाचे असते. 
त्यामुळेच महिला दिन सर्वच महिलांसाठी संस्मरणीय व्हावा, महिलांना त्यांच्या मनातील जिद्द सर्वांना सांगता यावी व यातून इतरांनाही प्रेरणा मिळावी यासाठी या अनोख्या व अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.1 ते 8 मार्च दरम्यान महिलांना आपला स्वत:चा फोटो व स्वत:च्या मनातील जिद्द नेमक्या शब्दात चार ते पाच ओळीपर्यंत मांडता येईल. सदर फोटो व लिखाण व्हॉटसअ‍ॅप, इमेलव्दारे अथवा प्रत्यक्ष सरस्वती हॉस्पिटलमध्ये आणून देता येणार आहे.  स्पर्धेतील सर्व प्रवेशिकांचे परीक्षण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल. दि.15 मार्च रोजी पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास 2001, व्दितीय 1501, तृतीय 1001 व उत्तेजनार्थसाठी 501 रुपयांचे पारितोषिक व आकर्षक ट्रॉफी, प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येईल. अधिक माहिती व आपला फोटो पाठविण्यासाठी व्हॉटसअप क्रमांक 8381838838. अधिकाधिक महिला, युवतींनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन सरस्वती हॉस्पिटलच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment