Friday, 1 March 2019

सायबर गुन्ह्यांबाबत प्रत्येकाने सतर्क रहावे ः कदम


नगर । प्रतिनिधी - गुन्हा कोणताही असो तो उघडकीस येतच असतो आणि गुन्हेगाराला शिक्षा होत असते. आजच्या डिजिटल युगात आता अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने गुन्हे होऊ लागले आहेत, ते गुन्हे सायबर क्राईममध्ये येत असतात. बँकेतून परस्पर पैसे काढणे, एटीएमची अदला-बदली, बँक अधिकारी असल्याचे सांगून पासवर्ड विचारुन बँकेतून पैसे काढणे, फेक मेल, व्हाटस्अपच्या माध्यमातून नोकरी, स्वस्तातील वस्तूंचे आमिष दाखवून फेक अकाऊंटवर पैसे पाठविण्यास सांगणे, ज्येष्ठ नागरिक, ई-बँकिंगची माहिती नसणार्‍यांची बँक खात्याची माहिती घेऊन परस्पर पैसे काढणे आदी गुन्ह्यांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यासाठी या आधुनिक साधनांचा वापर करतांना आता प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे. अनोळखी व्यक्तीला आपली वैयक्तिक, बँकेची इतर कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नये. विद्यार्थ्यांनीही आपल्या घरातील, शेजारील, नातेवाईक यांना याबाबत जागृत करावे, असे आवाहन नगर सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी केले.
न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजमधील बी.बी.ए.(सी.ए.) विभाग आयोजित कॉम्प व्हीजन 2019 कार्यक्रमामध्ये कदम यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, त्यांचे प्रकार आणि त्यासाठी होणार्‍या शिक्षा याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली. 
श्री.कदम व श्री.निलेश राळेभात यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.  कार्यक्रमास संस्थेचे सचिव जी.डी.खानदेशे, प्राचार्य डॉ.बी.एच.झावरे, उपप्राचार्य डॉ.एम.व्ही.गिते, विभागप्रमुख सौ.एस.एस.निंबाळकर आदी उपस्थित होते.
यावेळी बी.बी.ए. (सी.ए.) विभागातील विद्यार्थ्यांनी जिल्हाभर राबवलेल्या सायबर अवेअरनेस अभियानाचे कौतुक करुन क्वीकहिलकडून मिळालेले मानधन विद्यार्थ्यांना प्रदान केले. तसेच विविध स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतना आहुजा व कस्तुरी गायकवाड यांनी केले. प्रा.राजेश बडे यांनी आभार मानले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.एस.एस.तळुले, प्रा.एम.एस.सुरोशी, प्रा.ए.एस.कोकरे, प्रा.के.ए.सुपेकर यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment