नगर । प्रतिनिधी - ज्ञानांकुर शाळेत योग्य पद्धतीने विद्यार्थी घडविण्याचे, त्यांचे चांगले संगोपन करण्याबरोबरच त्यांच्या मनात भारतीय संस्कृतीची जोपासना करण्याची बीजे लहान वयातच रोवण्याचे काम केले जात आहे. सामाजिक भावना जपणार्या या ज्ञानांकुर शाळेचे भविष्यात विद्यापीठात रुपांतर व्हावे असे प्रतिपादन मंगल भक्त सेवा मंडळाचे राजाभाऊ कोठारी यांनी केले.
शहरातील आनंदधामजवळील ज्ञानांकुर नर्सरी स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण नुकतेच पार पडले, या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रा. अंजली शिरसाठ, सुनील हारदे, सुनील आंधळे, पालक प्रतिनिधी रुपाली निमसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
राजाभाऊ कोठारी पुढे म्हणाले, एखादी शाळा चालवणे हे सोपे काम नाही. मातीच्या गोळ्याला आकार देणार्या कुंभाराप्रमाणे लहान मुलांना घडविणार्या शाळा व शिक्षकांचे काम असते. हे काम करताना सामाजिक जाणीव जागृत होणे गरजेचे आहे. तरच आपण लहान मुलांना योग्य दिशा देवू शकतो. जर मुलांना योग्य दिशा मिळाली नाही तर जीवनाची दशा व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे आपले पाल्य आपण कोणत्या शाळेत पाठवावे हे जागृतपणे पाहण्याची जबाबदारी प्रत्येक पालकाची असते. आपण समाजाप्रती काही तरी देणे लागतो ही भावना ज्यावेळी जागृत होते, तेथून चांगले कार्य सुरु होत असते. याच भावनेतून 9 वर्षापूर्वी एका विद्यार्थ्यावर सुरु झालेल्या या ज्ञानांकुर शाळेचे रुपांतर आता वटवृक्षात झाले आहे. भविष्यात या शाळेचे विद्यापीठात रुपांतर व्हावे अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात शाळेच्या संचालिका सुजाता आंधळे यांनी शाळेत वर्षभर आयोजित केल्या जाणार्या उपक्रमांची माहिती दिली. आषाढी एकादशीनिमित्त दिंडी, गोपाळकाला निमित्त दहीहंडी, मकर संक्रात, रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन असे विविध सण उत्सव साजरे करण्याबरोबरच मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन, विविध स्पर्धा आयोजित केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभर सुरु असणार्या या उपक्रमांना सरोज गांधी यांचे नेहमीच मार्गदर्शन होत असते असेही त्या म्हणाल्या.
प्रा. अंजली शिरसाठ व रूपाली निमसे यांनीही यावेळी शाळेतील उपक्रमांचे कौतुक केले. शेवटी सौरभ आंधळे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment