Tuesday, 19 March 2019

हुंडेकरी स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीच्या खेळाडूंचे यश


नगर । प्रतिनिधी - हुंडेकरी स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून क्रिकेट खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. या माध्यमातून अनेक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून, विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये घवघवीत यश संंपादन करीत आहेत. अजीम काझी, किरण चोरमले, ओंकार येवले, अश्कान काझी, अनुज भोसले या अ‍ॅकॅडमीच्या क्रिकेटपटूंनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून नगरचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे. खेळाडूंंनी अधिक मेहनत घेतल्यास त्यांचा भारतीय संघात समावेश होऊ शकतो, असा विश्वास अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष वसीम सय्यद यांनी व्यक्त केला.
हुंडेकरी स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीतील क्रिकेटपटूंनी विविध स्पर्धांत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा क्रिकेट कीट बॅग देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष वसीम सय्यद बोलत होते. यावेळी कार्तिक नायर, अमित बुरा, अमोल तांबे, नदीम सय्यद, सर्फराज बांगडीवाला उपस्थित होते. अ‍ॅकॅडमीच्या वतीने गौरव करण्यात आलेल्या अजीम काझीने महाराष्ट्र संघाकडून मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत त्याने गुजरात विरुद्ध 32 चेंडूंत 39 धावा करून करी संघाला उपविजेतेपद मिळवून दिले आहे. 10 सामन्यांमध्ये गोलंदाजी करीत 7 बळी घेतले.
किरण चोरमले याने 14 वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. त्याने एक शतक व एकूण 240 धावा फटकावल्या. ओंकार येवले याने केंद्रीय विद्यालयांतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आंतर विद्यापीठ खेलकूद स्पर्धेत पश्चिम विभागाच्या मुंबई संघाकडून प्रतिनिधीत्व करीत चांगला खेळ केला. 
अश्कान काझी याने 14 वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड झाली. अनुज भोसले याची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पुणे विद्यापीठ संघाकडून निवड झाली होती. त्यानेही चमकदार कामगिरी केली.
या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक सर्फराज बांगडीवाला यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अरुण जगताप यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment