Thursday, 21 March 2019

आ. संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीची उमेदवारी


नगर । प्रतिनिधी-
राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून आमदार संग्राम जगताप यांना काल (बुधवार) उमेदवारी जाहीर केली. आ. जगताप यांची उमेदवारी जाहीर करुन राष्ट्रवादीने नगरच्या जागेचा पेच मिटविला आहे. तर दुसरीकडे भाजपकडून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. भाजपकडून डॉ. सुजय विखे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असली तरी खा. दिलीप गांधी यांनीही आशा सोडलेली नाही. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. भाजपची उमेदवारी विखेंना मिळणार की खा. गांधींना, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान, आ. संग्राम जगताप यांच्या उमेदवारीचे नगर शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून स्वागत करण्यात आले. सर्जेपुरातील रामवाडी परिसरातील नागरिकांनी तुतारीच्या व पारंपरिक वाद्यांच्या गजरात स्वागत केले. राष्ट्रवादीनेे अगोदर आ. अरुण जगताप यांना पसंती दिली होती. मात्र, भाजपकडून सुजय विखे यांचे नाव पुढे आल्याने राष्ट्रवादीनेही तरुण आणि तुल्यबळ उमेदवार देण्याचा विचार सुरू केला. त्यानुसार अखेर आ. संग्राम जगताप यांची उमेदवारी काल (बुधवार) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. आ. संग्राम यांची उमेदवारी जाहीर झाल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा घोळ मिटला आहे. आता आ. संग्राम जगताप व डॉ. सुजय विखे यांच्यात सरळ लढत होईल, अशी चर्चा आहे. मात्र भाजपने अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. एक-दोन दिवसात भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यात नगर दक्षिणची उमेदवारी जाहीर झाल्यास चित्र स्पष्ट होईल. सुजय विखे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे सुजय विखे निर्धास्त झाले होते. मात्र खा. दिलीप गांधी यांनीही आशा न सोडता पुन्हा उमेदवारी खेचून आणण्यासाठी दिल्लीत तळ ठोकला आहे. तसेच खा. गांधी यांच्या समर्थकांनीही मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केल्याने सुजय विखे यांच्या गोटातही अस्वस्थता पसरली आहे. सुजय विखे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी भाजपमधील गांधी विरोधकांसह विरोधी पक्षातील नेत्यांनीही देव पाण्यात ठेवले आहेत. मात्र दिल्लीतून कोणाला उमेदवारी जाहीर होते, याकडे मतदारसंघाचे लक्ष्य लागले आहे.

No comments:

Post a Comment