नगर । प्रतिनिधी - महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती व महिला बालकल्याण समितीच्या सभापती-उपसभापतीच्या निवडी सोमवार, दि. 4 मार्च रोजी होणार आहेत. त्यासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवट दिवस होता. सेनेकडून योगीराज गाडे, राष्ट्रवादीकडून अविनाश घुले व भाजपच्या पाठिंब्याने मुद्दस्सर शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तीन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. स्थायीसाठी भाजपने उमेदवार दिला नाही. मात्र बालकल्याण समितीच्या सभापतीसाठी सेना- भाजप अशी लढत असल्याने मनपात युती होणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. वरिष्ठ पातळीवर युती झाली असली तरी नगरच्या मनपात मात्र युती दुभंगलेलीच दिसते आहे.
महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी सेनेकडून पुष्पा बोरूडे व उपसभापती पदासाठी सुवर्णा गेनप्पा यांनी तर भाजपकडून सभापतीपदासाठी लता शेळके यांनी अर्ज दाखल केले आहेत. उपसभापती पदासाठी गेनप्पा यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तिथे भाजप व राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही. तर बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी लता शेळके व सेनेच्या पुष्पा बोरूडे यांच्यात सरळ-सरळ लढत होणार आहे. त्यामुळे युतीचा धर्म नगरच्या नेत्यांनी पाळलेला दिसत नाही. विशेष म्हणजे राष्ट्रवादीने महिला व बालकल्याण समितीसाठी एकही अर्ज भरला नाही. त्यामुळे महिला बालकल्याणमध्ये सेना-भाजप अशीच निवडणूक होईल.
मनपाच्या सभागृहात सोमवारी सकाळी 11 वाजता स्थायी सभापतीच्या निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ होईल. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी काम पाहतील. सर्वप्रथम स्थायी समितीच्या सभापतीची व त्यानंतर महिला बालकल्याण समितीच्या निवडी होणार आहेत. उमेदवारी अर्ज साठी आज शेवटचा दिवस असल्याने दुपारी 1.45 मिनिटाने सेनेकडून अर्ज दाखल झाला आहे. तर राष्ट्रवादीकडून
सभापती पदासाठी घुले यांनी 2.15 वाजता अर्ज भरला. त्यापाठोपाठ लगेच मुद्दस्सर शेख यांनीही अर्ज दाखल केला. मनपाच्या दृष्टीने आर्थिक केंद्रबिंदू असणार्या स्थायी समितीच्या सभापती पदासाठीची लढत चुरशीची होणार आहे. दरम्यान, भाजपने मात्र स्थायीसाठी उमेदवार दिला नसल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
No comments:
Post a Comment