नगर । प्रतिनिधी - राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांची मानवसेवेची शिकवण तंतोतंत अंमलात आणण्यासाठी जैन सोशल फेडरेशन पूर्ण समर्पित भावनेने काम करीत आहे. या सेवाभावी कार्यात अनेक दानशूरांचा सहभाग असतो. अशा मदतीतूनच रूग्णसेवेचे मोठे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटल अव्याहतपणे करीत आहे. या सेवाकार्याच्या विस्तारात अनेक ज्ञात-अज्ञात दानशूर मंडळींचा सिंहाचा वाटा आहे. अशा मदतीमुळे मानवसेवेच्या कार्याचा विस्तार होत असल्याचे समाधान आहे, असे प्रतिपादन डॉ.प्रकाश कांकरिया यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या चौथ्या व पाचव्या मजल्याच्या कामाचे लोकार्पण दि.28 मार्च रोजी होत आहे. या कार्याला हातभार म्हणून स्व.सौ सरयूताई रसिकलालजी संघराजका यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हॉस्पिटलच्या 4 थ्या मजल्यावरील स्पेशल रूमसाठी संघराजका परिवाराने 11 लाख रुपयांची देणगी दिली आहे. हसमुख ऑटोमोबाईल्सचे रसिकालालजी लक्ष्मीचंदजी संघराजका यांनी या मदतीचा धनादेश नुकताच डॉ.कांकरिया यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी डॉ.सुधा कांकरिया, शिंगवी चष्माघरचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंगवी, आयएमएचे अध्यक्ष डॉ.सी.डी.मिश्रा, डॉ.निसार शेख, प्रकाश छल्लानी आदी उपस्थित होते.
संघराजका म्हणाले की, आचार्यश्री आनंदऋषीजी महाराज यांच्यासारख्या महान विभूतींच्या शिकवणीनुसार जैन सोशल फेडरेशन रूग्णसेवेचा वसा चालवत आहे. गोरगरीब रूग्णांसाठी हे हॉस्पिटल वरदान ठरत आहे. केवळ नगरच नव्हे तर राज्याच्या, देशाच्या विविध भागातून याठिकाणी रूग्ण येत असतात. प्रत्येकाला आपुलकीची व जागतिक दर्जाची आरोग्यसेवा मिळण्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत असतात. अशा या कार्यासाठी मदतीचा हात देताना मनस्वी आनंद होत आहे. आचार्यश्रींच्या कृपाशिर्वादामुळेच ही मदत करणे शक्य झाल्याचे आम्ही मानतो. शेवटी प्रकाश छल्लानी यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment