नगर । प्रतिनिधी - आनंदऋषी हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळणार्या सर्वोत्तम सेवेमुळे सर्वसामान्यांबरोबरच संपन्न परिवाराचा शिबिरात वाढता सहभाग ही समाजाला अत्यंत प्रेरणादायी बाब असल्याचे मत हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे सचिव डॉ. सागर झावरे यांनी व्यक्त केले.
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्रीआनंदऋषीजी म.सा. यांच्या 27 व्या पुण्यस्मृतीनिमित्त महावीर फूड प्रोडक्टचे श्रीमान महावीर बडजाते व श्रीमान अशोक चुडीवाल यांच्या परिवाराच्या सहकार्याने आयोजित मोफत स्त्रीरोग व गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे सचिव डॉ. सागर झावरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महावीर बडजाते, अशोक चुडीवाल, किरण बोरा (वडगाव शेरी), ललित छाजेड (पुणे), विनोद छाजेड (वैजापूर), इंजी.श्रीकांत काकाणी, इंजी.संदीप काकाणी, अॅड. संतोष गुगळे, सचिन कटारिया, आर्कीटेक सौ. कविता जैन, डॉ.प्रकाश कांकरिया, निहारिका बडजाते, कुणाल बडजाते, डॉ. रवींद्र मुथा, डॉ.निलोफर धानोरकर, संतोष बोथरा, डॉ. आशिष भंडारी, बाबुशेठ लोढा, प्रकाश छल्लाणी, डॉ. मनोहर पाटील उपस्थित होते.
स्वागत करताना डॉ. कांकरिया म्हणाले की, उत्तम आरोग्य सेवा देणे याच उद्देशाने दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने नवनवीन योजना येथे राबविण्यात आल्या आहेत. सध्या नेत्रालय व हृदयरोग विभागाचा लाभ हजारो रुग्णांना झाला आहे. राज्यातील नव्हे तर देशातील रुग्णांना विश्वास व दिलासा देण्याचे कार्य सर्वांच्या सहकार्याने सतत सुरु आहे.
प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी सांगितले की, आता नवीन दोन मजले सेवेसाठी उपलब्ध झाले असून त्याचा अधिक रुग्णांना फायदा होईल.देशात एकाच ठिकाणी सर्वात जास्त डायलेसीस सेवा या हॉस्पिटलमध्ये आता दिली जाईल.
यावेळी वडगाव शेरीचे सामाजिक कार्यकर्ते किरण बोरा म्हणाले की, प्रत्येक भेटीत या हॉस्पिटलमध्ये रुग्ण सेवेत नाविन्यता व आधुनिकता दिसून येते. पुण्याचेही रुग्ण येथे उपचारासाठी मोठ्या विश्वासाने येतात. या सेवेत सहभागाचा आनंद आम्हा सर्वांना नेहमीच प्राप्त होतो.
आर्कीटेक्ट कविता जैन यांनी मनोगत सांगितले की आदर्शऋषींचे आशीर्वाद व प्रेरणेमुळे हॉस्पिटलच्या कार्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभले आहे. हॉस्पिटलच्या इंटेरीअरच्या कामातून मिळालेले समाधान लाखमोलाचे आहे. यापुढेही हे कार्य करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. दि.21 मार्च रोजी प्लास्टिक सर्जरी शिबिर होणार आहे. त्याचा गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन फेडरेशनतर्फे करण्यात आले आहे.शिबिरात 266 महिलांची तपासणी करण्यात आली. सूत्रसंचालन दत्ता वारकड यांनी केले तर आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.
No comments:
Post a Comment