नगर । प्रतिनिधी-
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून स्टार प्रचारकांची यादीर जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसनेही महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यातील निवडणुकांसाठी 40 स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह राज्यातील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने नगरची जागा सुजय विखे पाटील यांच्यासाठी न सोडल्यामुळे विखे पाटील सध्या नाराज आहेत. काँग्रेसच्या पत्रकार परिषदा, सभा, मेळाव्यांपासूनही ते दूर राहात आहेत. नगरमध्ये आपण प्रचाराला जाणार नाही, असेही याआधीच विखेंनी जाहीर केलेले आहे. त्यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील भाजपाच्या चिन्हावर नगर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी करणार आहेत. दुसरीकडे विखे पाटील यांच्यासह माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचेही नाव स्टार प्रचारांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांमध्ये अभिनेत्री नगमा, माजी क्रिकेटर मोहम्मद अझहरुद्दीन, प्रसिद्ध शायर इम्रान प्रतापगडी यांचीही नावे आहेत. महाराष्ट्रातील विविध समूहांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी तयार केल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे नेते मोतीलाल व्होरा यांनी काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची ही यादी प्रसिद्ध केली असून, हीच यादी निवडणूक आयोगालाही सुपूर्द केली जाणार आहे.
No comments:
Post a Comment