Thursday, 21 March 2019

जिल्ह्यात दरवर्षी चिमण्यांच्या सरासरी संख्येत सुमारे 3 ते 5 टक्क्यांनी घट


नगर । प्रतिनिधी -
पशु, पक्षी,  झाडे, किटक व मानव हे सर्व जैवपर्यावरणातील महत्त्वाचे घटक आहेत. हे सर्व अन्नसाखळीद्वारे एकमेकांशी जोडले गेल्यामुळे एकाच्या संख्येवर झालेला परिणाम हा दुसर्‍यांवर निश्चितच प्रभाव टाकणार आहे. गेल्या 10 वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यात निसर्ग अभ्यासक जयराम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने जिल्हास्तरीय पक्षीगणनेचे आयोजन केले जात असून याद्वारे प्राप्त अहवालानुसार अहमदनगर जिल्ह्यात दरवर्षी चिमण्यांच्या सरासरी संख्येत सुमारे 3 ते 5 टक्क्यांनी घट होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
चिमणी व तत्सम पक्षी हे मुख्यत: शेती पिकांवरील किडे-अळ्या खाऊन जगतात, पिल्लांना भरवण्यासाठी त्यांच्या वाढीसाठी प्रथिनयुक्त किड्यांची गरज वाढल्याने याकाळात तर त्यांच्या निरीक्षणशक्तीत प्रचंड प्रमाणात वाढ होते. यावेळी शेतीपिके अक्षरक्ष: पिंजून काढून ते नकळत या किडीच्या प्रादूर्भावापासून पिकांचे रक्षण करून नैसर्गिक किटकनाशकाचे कार्य करतात.
चिमण्यांच्या दिवसेंदिवस घटत जाणार्‍या प्रमाणामुळे शेतीपिकांवरील किडीच्या प्रमाणामध्ये प्रचंड वाढ होत आहे. परिणामी शेतकर्‍यालाही किटकनाशकांचा जास्त वापर करावा लागत आहे. ज्याचे दुष्परिणाम कॅन्सरसारख्या विविध आजारांद्वारे मानवालाच भोगावे लागत आहेत. ही बाब संशोधनाद्वारेही आता सिद्ध होऊ लागली आहे. चिमणी हा मनुष्यवस्तीमध्ये मानवासोबत राहणारा व जगू शकणारा पक्षी आहे. त्यामुळे त्यांच्या घटत्या संख्येलाही सर्वस्वी मानवच जबाबदार असून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारीसुद्धा मानवावरच येऊन ठेपली आहे.
त्यांच्या संख्येत घट होण्याची मुख्य कारणे म्हणजे आधुनिकीकरण, वळचणींची ठिकाणे नसलेले घरे, अन्न व पाण्याचे दुर्भिक्ष्य व मोबाईल टॉवरचे तरंग आदी आहेत.
अहमदनगर जिल्हा निसर्गप्रेमी संघटना ही गेल्या 15 वर्षांपासून जिल्ह्यात कार्यरत असून त्याद्वारे निसर्गातील जैवविविधतेचा शोध व त्यांचे संरक्षण-संवर्धन करण्यासाठी विविध जिल्हाव्यापी उपक्रम हाती घेतले जात आहेत. या उपक्रमांमध्ये दरवर्षी अनेक स्वयंसेवी संघटनाही आपले योगदान देत असून आवश्यक त्याठिकाणी वनविभागाचीही मदत घेतली जात आहे.
यावर्षी जिल्ह्यातील दुष्काळसदृष्य स्थिती व पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता पशुपक्ष्यांचे व विशेषत: चिमण्यांचेही संरक्षण व संवर्धन होण्याच्या हेतूने एक मूठ धान्य-एक ओंजळ पाणी व एक रुपया पशुपक्ष्यांसाठी हे जिल्हाव्यापी अभियान निसर्गप्रेमींनी सुरू केले असून जिल्हाभरातील शेकडो शाळा, स्वयंसेवी संघटना व ग्रामस्थ यात सहभागी होत आहेत. या अभियानाद्वारे धान्य संकलन करून पशुपक्ष्यांसाठी आपल्या घर व शाळा परिसरात अन्नपाण्याची सोय केली जात आहे. याबरोबरच शाळांतून जमा होणार्‍या वर्गणीतून वनविभागातील व नैसर्गिक पाणवठे भरण्याचे व ठिकठिकाणी पाणवठे बनवण्याचे नियोजन केले जात आहे.
उपक्रमाच्या पुढील टप्प्यात चिमण्या व तत्सम पक्षांना मानवी वसाहतीमध्येच राहण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी या हेतूने कृत्रिम घरटी तयार करून ते सर्वत्र बसविण्याचे नियोजन केले जात आहे. या सर्व उपक्रमांवर सातत्याने कार्य झाल्यास निश्चितच जिल्हाभरात पुन्हा एकदा चिमण्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागेल असा निसर्गप्रेमींना विश्वास आहे.
निसर्गप्रेमींच्या या उपक्रमात जिल्हाभरातून शेकडो शाळा व स्वयंसेवी संघटना सहभागी होत असल्या तरी प्रत्येकाने या कार्यात आपला सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष निसर्ग अभ्यासक जयराम श्रीरंग सातपुते (मो. 9604074796) यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment