Saturday, 2 March 2019

संधी मिळाल्यास नगर औद्योगिक वसाहतीच्या प्रश्नास सर्वोच्च प्राधान्य ः सुजय विखे


नगर । प्रतिनिधी - कुठल्याही शहराचा विकास तेथील औद्योगिक वसाहतीवर अवलंबून असतो.  नगरमध्ये एम.आय.डी.सी स्थापन होऊन अनेक वर्ष झाली. परंतु उद्योगांना स्थलांतरित व्हावे लागले त्यामुळे नगरचा विकास थांबला आहे. संधी मिळाल्यास नगर औद्योगिक वसाहती संदर्भात, तिथे नवीन उद्योगधंदे येण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती होण्यासाठी आपण शर्तीचे प्रयत्न करू, असे प्रतिपादन युवा नेते डॉ. सुजय विखे यांनी केले. नगर शहरामध्ये विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते
औद्योगिकीकरण हाच विकासासाठी राजमार्ग आहे. त्यामुळे कुठल्याही शहराची वेगाने विकास होण्यास मदत होते. गत काही वर्षांपासून राज्यातील अनेक शहरांनी औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून शहराचा विकास साधला. दुर्दैवाने  नगरमध्ये एमआयडीसीची स्थापना होऊन या एमआयडीसीमध्ये अपवाद सोडला तर हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच मोठे उद्योग शिल्लक राहिले आहेत. यातील काही उद्योग हे राजकीय कारणांमुळे स्थलांतरित झाले आहेत. आपल्याला नगर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यास उद्योगांना पोषक असे वातावरण निर्माण करण्याचा आपला प्रयत्न राहील व  उद्योगांच्या माध्यमातून छोटे व मध्यम, लघु उद्योग सुद्धा स्थिरावतील तसेच नगरच्या अर्थकारणाला चालना मिळेल असा विश्वास आपल्याला आहे या उद्योगांच्या माध्यमातून बेरोजगारी समाप्त होईल. त्यामुळे संधी मिळाल्यास पहिले प्राधान्य हे नगर औद्योगिक वसाहतीच्या प्रश्नासंदर्भात असेल असे विखे पाटील यांनी सांगितले.
यावेळी विखे यांच्या हस्ते तालीम संघाच्या सत्काराचा कार्यक्रम सर्जेपुरा येथे घेण्यात आला. सप्तपदी लॉन्स व प्रभाग क्रमांक 14 मध्ये नागरिकांशी संवाद साधण्यात आला. या विविध कार्यक्रमांचे आयोजन वैभव लांडगे, जितेंद्र लांडगे, सुभाष लोंढे, नीलेश खरपुडे, संजय झिंजे, अजय औसरकर, निखिल वारे, धनंजय जाधव, बाळासाहेब पवार या कार्यकर्त्यांनी केले होते. या  बैठकींसाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment