Saturday, 2 March 2019

‘एनईएफ एन्ड्युरो’ शर्यतीत ‘व्हिक्टरी पेडलर्स’ द्वितीय


नगर । प्रतिनिधी - ‘नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी’ यांनी पुण्यात गेल्या आठवड्यात आयोजित केलेल्या ‘एनईएफ एन्ड्युरो’ या राज्य पातळीवरील साहसी शर्यतीत नगरच्या ‘व्हिक्टरी पेडलर्स’ संघाने दुसरा क्रमांक पटकाविला. या संघाने तीस हजार रुपयांचे पारितोषिक जिंकले.
या संघात संकल्प निर्मलचंद्र थोरात (नगर), प्रणिता प्रफुल्ल सोमण (संगमनेर) व प्रतीक संजय पाटील (कोल्हापूर) यांचा समावेश होता. संकल्प, प्रतीक व प्रणिता यांचा संघ ‘100 मिक्स’ गटात सहभागी झाला होता. त्यामध्ये 120 किलोमीटर सायकल चालविणे, डोंगर-दर्‍यातून 20 किलोमीटरची पदभ्रमंती आणि दोराच्या सहाय्याने नदी ओलांडणे (रिव्हर क्रॉसिंग) याचा समावेश असतो. तब्बल 12 तास चालणारी ही शर्यत सर्वार्थाने शारीरिक क्षमता व क्रीडा कौशल्ये याची कसोटी घेणारी असते. संघातील तिन्ही खेळाडूंनी प्रत्येक प्रकार पूर्ण करणे आवश्यक असते. ‘व्हिक्टरी पेडलर्स’मधील तिन्ही खेळाडू विशीच्या आतील आहेत. खुल्या गटात त्यांनी मिळविलेले हे यश कौतुकास्पद मानले जाते.
संकल्प थोरात मूळचा खो-खोपटू असून, अलीकडच्या काही वर्षांत त्याने सायकलिंगमध्ये चमक दाखविली आहे. राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये त्याने ठसा उमटविला आहे. मूळची संगमनेरची असलेली प्रणिता सध्या नगर येथे सायकलिंगचा सराव करते. हे दोघेही प्रसिद्ध सायकलिंग प्रशिक्षक सुभेदार सुमेरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. 
कोल्हापूरचा प्रतीकही राज्य पातळीवरील अव्वल सायकलपटू आहे. सायकलिंगमुळे ओळख झालेल्या या तिन्ही क्रीडापटूंनी या शर्यतीत उतरण्याचे ठरविले आणि यशही मिळविले.
‘व्हिक्टरी पेडलर्स’मधील सर्व सदस्य सायकलपटू आहेत. पदभ्रमण व रिव्हर क्रॉसिंग या क्रीडाप्रकारांचा त्यांना फारसा अनुभव नाही. असे असतानाही त्यांनी पदार्पणातच यश मिळविले.

No comments:

Post a Comment