नगर । प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी 9 पोलिस निरीक्षकांसह एक सहाय्यक पोलिस निरीक्षक व तीन उपनिरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या केल्या आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशावरुन आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसारित केलेल्या मार्गदर्शक सूचना व निर्देशानुसार लोकसभा निवडणूक कामकाजाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध येणार्या जिल्ह्यातील पोलिस अधिकार्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यासाठी काल (दि. 28) जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते या अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांची शिर्डी शहर वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याचे पीआय विकास दौलतराव वाघ यांची बदली केली आहे. नियंत्रण कक्षातील पीआय हारुण पापामियॉ मुलानी यांची तोफखाना पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. आश्वी पोलिस ठाण्याचे पीआय अनिल कटके यांची शिर्डी पोलिस ठाण्यात तर येथील अरविंद माने यांची बेलवंडी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील पीआय मसुदखान मेहबुब खान यांची विकास वाघ यांच्या जागी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. पीआय मुकुंद देशमुख यांची नियंत्रण कक्षातून अकोले पोलिस ठाण्यात, शिर्डी वाहतूक शाखेचे पीआय गोकुळ औताडे यांची सायबर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील पीआय सुधाकर मांडवकर यांची अनिल कटके यांच्या जागी आश्वी पोलिस ठाण्यात बदली झाली आहे.
पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दिनकर सखाराम मुंडे यांची नगर तालुका पोलिस ठाण्यात बदली केली आहे. शिर्डी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अशोक खरात यांची राहाता पोलिस ठाण्यात तर खरात यांच्या जागी तोफखाना पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय सोनवणे यांची बदली झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांची विनंतीवरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या ठिकाणी तात्काळ हजर राहण्याचे आदेशही एसपी शर्मा यांनी दिले आहेत.
No comments:
Post a Comment