नगर । प्रतिनिधी - पुणे शहर आणि परिसरातील कमाल तापमानाचा पारा गेल्या तीन दिवसांपासून 37 अंश सेल्सिअसच्या पुढे असल्याने शहरात उकाडा जाणवत आहे. पुढील आठवडाभर तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात किंचित घट, तर किमान तापमानात वाढ होणार असल्याने रात्रीचा उकाडा वाढणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात पुढील दोन ते तीन दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याबरोबरच हवामान विभागाकडून विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. सोमवारी नगर येथे राज्यातील उच्चांकी 40.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर आणि नाशिक वगळता बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 36 ते 39 अंशांवर आहे. कोकण विभागातील मुंबईत 31.5, तर सांताक्रुझ येथे 34 अंश कमाल तापमानाची नोंद झाली. सरासरीपेक्षा हे तापमान अधिक आहे. मराठवाडयात औरंगाबाद येथे 36.6 अंश कमाल तापमान नोंदविले गेले. विदर्भात अमरावती, चंद्रपूर, वर्धा येथे 38 अंश, अकोला, ब्रह्मपुरी, वाशिम आदी भागात कमाल तापमान 37 अंशांपुढे नोंदविले गेले आहे.
No comments:
Post a Comment