नगर । प्रतिनिधी - श्रीरामपूरवरुन नगर शहरात दरोडा टाकण्यासाठी चार मोटारसायकलींवरुन येत असलेल्या सहा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी देहरे टोलनाक्यावर सापळा लावून जेरबंद केले.
अल्तमश नासीर पठाण (वय 21, रा. श्रीरामपूर), अविनाश श्रीधर साळवे (वय 20, रा. राहुरी), सिराज उर्फ सोल्जर अयूब शेख (वय 23, रा. श्रीरामपूर), सागर गोरख मांजरे (वय 20, रा. श्रीरामपूर, हल्ली पाईपलाईन रोड, कोहिनूर मंगल कार्यालयामागे, नगर), भाऊसाहेब मधूकर गोरे (वय 26, रा. श्रीरामपूर), शाहरुख निसार पिंजारी (वय 22, रा. श्रीरामपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोन मोटारसायकलींवर पाठीमागे अरीफ गफूर शेख, अमोल नारायण होडगर (दोघे रा. पिंपरी अवघड, ता. राहुरी) हे बसलेले होते. पोलिसांना पाहताच ते अंधाराचा फायदा घेऊन दुचाकींवरुन उड्या मारुन पळून बाजूच्या शेतात पळून गेले. आरोपींकडून एक लोखंडी सुरा, कटावणी, सत्तूर, दोन लाकडी दांडके व नायलॉन दोरी, 5 मोबाईल आणि चार मोटारसायकली असा एकूण 1 लाख 65 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यांनी यातील एक दुचाकी भिंगारमधून तर एक श्रीरामपूरमधून चोरुन आणल्याची कबुली दिली. तर एक विवो कंपनीचा मोबाईल सर्जेपुरा येथून चोरी केल्याची सिराज शेख याने कबुली दिली. अल्तमश पठाण याच्यावर तोफखाना व भिंगार कॅम्प पोलिसांत प्रत्येकी एक, सागर मांजरे याच्या विरोधात तोफखाना पोलिसात चार, सिराज शेख याच्यावर श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात 5, अविनाश साळवे याच्यावर राहुरी पोलिसांत 4, भाऊसाहेब गोरे याच्यावर श्रीरामपूर शहर पोलिसमध्ये दोन, शाहरुख पिंजारीच्या विरोधात श्रीरामपूर शहर व राहुरी पोलिसांत प्रत्येकी एक गुन्हा नोंद आहे. ते कोठे दरोडा टाकणार होते, याबाबत त्यांनी काहीही माहिती दिली नाही. या सर्वांवर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment