नगर । प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यातील साकूर येथील रमेश फिरोदिया कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अॅण्ड कॉमर्सच्या प्रांगणात गुरूवार दि.7 मार्च रोजी सकाळी 10 वाजता महामांगलिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योजक सी.ए.रमेश फिरोदिया, सौ.सविता रमेश फिरोदिया व साकूर येथील फिरोदिया परिवाराच्या यांच्या खास आग्रहास्तव साकूरमध्ये हा कार्यक्रम होत आहे. यात पूज्य विदुषी गुरूमैय्या मधुलताश्रीजी महाराज यांच्या सुशिष्या, श्रीमणिभद्रवीर उपासिका, महामांगलिक प्रभाविका, संघ समन्वय साधिका पूज्य कैवल्यरत्नाश्रीजी महाराज यांच्या मधुरवाणीतून महामांगलिक पाठ होईल. यावेळी पूज्य गुरूस्मृतीश्रीजी महाराज, पूज्य नमोतीर्थाश्रीजी आदिठाणा उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमानंतर गौतम प्रसादीची व्यवस्था करण्यात आली आहे. याचदिवशी दुपारी 4 वाजता साकूरमधीलच विद्या प्रबोधिनी शाळेतील कार्यक्रमात शाळेच्या तीन विभागांना मातोश्री बदामबाई फिरोदिया प्रशाला प्राथमिक, मातोश्री बदामबाई फिरोदिया प्रशाला माध्यमिक व प.पू.कनकमलजी (बाबूशेठ) फिरोदिया उच्च माध्यमिक विद्यालय असे नाव देण्यात येणार आहे. पूज्य कैवल्यरत्नाश्रीजी महाराज यांच्याच शुभहस्ते हा नामकरण सोहळा होणार आहे.
या महामांगलिक पाठ कार्यक्रमात हजारो भाविक एकाचवेळी आध्यात्मिक शांती व शुध्द विचारांची अनुभूती घेणार आहेत. नगरसह संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी भागातील भाविक या कार्यक्रमानिमित्त साकूरला येत असल्याची माहिती रमेश फिरोदिया यांनी दिली.
महामांगलिक पाठाने आत्मिक शांततेची अनुभूती येते तसेच कार्यक्रमस्थळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मंत्रोच्चाराचा दिव्य नाद, महामंत्र, स्तोत्र यातून प्रत्येकामध्येच नवचेतना व उत्साह निर्माण होण्यास मदत होते. अशा या मंगलकारी पाठाची प्रत्यक्ष अनुभूती घेण्याची संधी साकूरकरांना मिळाली आहे. या महामांगलिक कार्यक्रमास तसेच नामकरण सोहळ्यास नाशिक चांदवड येथील श्री नेमीनाथ जैन ब्रह्मचर्याश्रमाचे विश्वस्त बेबीलालजी संचेती, नगर मर्चंटस् बँकेचे संस्थापक हस्तीमलजी मुनोत, श्रीगोपालजी धूत आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहे.
पूज्य कैवल्यरत्नाश्रीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हार भगवती येथे उभारण्यात येणार्या कैवल्यधाम जैन मंदिराचे लवकरच उद्घाटन होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन साकूर येथील फिरोदिया परिवार तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सेवाभावी संस्थेचे चेअरमन इंद्रजित खेमनर, व्हाईस चेअरमन शंकरराव खेमनर, सेके्रटरी भाऊसाहेब सागर व संचालक मंडळाने केले आहे.
No comments:
Post a Comment