Tuesday, 26 March 2019

आता आपली लढाई दूष्ट प्रवृत्तींशी : डॉ. सुजय विखे


पारनेर । प्रतिनिधी-
पारनेर तालुक्याने विखे पाटील परिवाराच्या राजकीय, सामाजिक वाटचालीला कायम साथ दिली. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या विचारांना साथ देऊन, प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची तयारी या तालुक्याने ठेवली. मात्र आता प्रश्नांबरोबरच आपली लढाई ही दृष्ट प्रवृत्तींशी आहे, अशा शब्दात डॉ. सुजय विखे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
पारनेर येथे आयोजित भाजप-शिवसेना युतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपसभापती विजयराव औटी, पंचायत समिती सभापती राहुल झावरे, भाजपचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विकास रोहकले आदी उपस्थित होते.
सुजय विखे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने मोठ्या मनाने मला पक्षात सामावून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेतले. राज्यात फडणवीस सरकारनेही अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा दिलासा दिला. त्यामुळेच आपण मोदी यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या माध्यमातून दक्षिण जिल्ह्याचा कायापालट करू, असेही ते म्हणाले.
विजयराव औटी म्हणाले की, पारनेर तालुक्यात स्व.खा.बाळासाहेब विखे पाटील यांना माननारा मोठा वर्ग आहे. या कुटुंबाला मोठी परंपरा आहे. शिवसेना शिस्त पाळणारा पक्ष असून, तालुक्यातून विखेंच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत.

No comments:

Post a Comment