Saturday, 2 March 2019

लिटिल फ्लॉवर प्री स्कूलमध्ये ग्रीन डे साजरा


नगर । प्रतिनिधी -  रखरखीत उन्हात हिरवीगार वनराई नजरेसमोर आल्यावर डोळ्याला, मनाला आनंद वाटतो. हिरव्या पालेभाज्या, फळभाज्यांमध्येही अशीच शरीराचे संपूर्ण पोषण करण्याची ताकद आहे. अनेक आजारांना दूर पळवणार्‍या हिरव्या भाज्या रोजच्या आहारात असल्यास शरीर व मन दोन्ही सुदृढ राहते. यासाठी मुलांनी लहान वयातच हिरव्या भाज्या खाण्याची सवय स्वत:ला लावून घ्यावी. पर्यावरण संवर्धनासाठी आजकाल सर्वत्र गो ग्रीनचा संदेश दिला जातो. तसेच आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येकाने गो ग्रीनचा मंत्र आत्मसात करावा, असे आवाहन लिटिल फ्लॉवर प्री स्कूलच्या संचालिका मनिषा बोगावत यांनी केले.
इमारत कंपनी येथील लिटिल फ्लॉवर प्री स्कूलमध्ये गो ग्रीन उपक्रमांतर्गत हिरवा रंग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुलांनीही हिरव्या रंगाचे ड्रेस परिधान केले होते. पालक, शेपू, मेथी, कांद्याची पात, दुधी भोपळा, कारले, दोडके, चुका, अंबाडा, भेंडी, मेथी अशा अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या कार्यक्रमात ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक भाजीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. 
शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यापासून शरीराच्या वाढीत हिरव्या भाज्या कशापध्दतीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात हे विद्यार्थ्यांना अतिशय सहजसोप्या भाषेत समजावून सांगण्यात आले. हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे. मुलांनी या रंगाच्या भाज्या दैनंदिन आहारात आवर्जून खाव्यात, पालकांनीही वेगवेगळे पदार्थ तयार करताना त्यात अधिकाधिक हिरव्या भाज्या कशा येतील याकडे आवर्जुन लक्ष देण्याचे आवाहन या कार्यक्रमातून करण्यात आले. 
या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षिकांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment