नगर । प्रिंतनिधी - विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास आणि छंद याचा समतोल साधला तर त्यांना आनंद आणि मानसिक समाधान मिळेल व त्यातूनच व्यक्तिमत्त्व घडू शकते, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व कवी डॉ. कैलास दौंड यांनी केले.
मसाप सावेडी उपनगर शाखा व शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशनच्या वतीने जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त रेणावीकर माध्यमिक विद्यालयात आयोजित ‘लेखक तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, प्रा. मेधाताई काळे, भालचंद्र बालटे, सदानंद भणगे, सुरेश चव्हाण, नंदकुमार आढाव, मुख्याध्यापक एन. एन. वसावे, अनघा अत्रे, मसाप सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह जयंत येलूलकर आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
इयत्ता आठवीच्या बालभारतीच्या पुस्तकात असलेल्या ‘गोधडी’ या कवितेचे डॉ. कैलास दौंड यांनी विद्यार्थ्यांसमोर वाचन केले. कवितेचा अर्थ समजावून सांगितला तसेच विद्यार्थी ते कवी अशी आपली जडणघडण कशी झाली याबद्दल आपले अनुभव कथन केले. विद्यार्थ्यांनी विपुल प्रमाणात वाचन केले तर त्यांचे अनुभवविश्व समृद्ध होते व त्यातूनच लेखनाची प्रेरणा मिळते असे ते म्हणाले.
आपल्या बालपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत निवांत क्षणी आई आपल्या घरातील जुन्या कपड्यांचे गाठोडे सोडी, आम्ही भावंडं तिच्याभोवती गोळा होत असू. त्यातील एकेक कपडा ती बाहेर काढत असे. प्रत्येक कपड्याच्या आठवणी सांगत असे असे. त्या कपड्यात माझा लहानपणीचा सदरा, माझ्या आक्काचा फ्रॉक, दादाची विजार, वडिलांची कोपरी, धोतर आणि शेवटी घडी करून ठेवलेले आईचं जुनं लुगडं, असे कपडे एकमेकांशी घट्ट शिवून वडिलांच्या जुन्या फाटक्या धोतराचे अस्तर आई या गोधडीला लावत असे. आईच्या या कलाकुसरीतून एक सुंदर व ऊबदार गोधडी तयार होत असे. ही गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचं बोचकं नव्हतं तर अनेक सुख-दुःखाच्या आठवणींच्या सुईने शिवलेलं, आईच्या मायेची ऊब देणारे एक अंथरूण-पांघरूण होतं अशा शब्दात त्यांनी आपली कविता विद्यार्थ्यास समजावून सांगितली.
यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. तसेच मेघाचं वारू, मी आस धरुनी आहे पीक इथे उगवण्याची तसेच ढव व इतर कविता सादर केल्या. शारदा होशिंग यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीतून कवी डॉ. कैलास दौंड यांचे अनुभवविश्व अलगदपणे उलगडले.
मुख्याध्यापक एस.एम. वसावे यांनी उपक्रमाचा उद्देश सांगितला.
यावेळी अश्विनी कुलकर्णी यांनी मराठी भाषेचा गौरव करणारे मनोगत व्यक्त केले. डॉ. कैलास दौंड व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन व कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या ‘मायबोली’ या हस्तलिखित साहित्य प्रदर्शनाचे डॉ. कैलास दौंड यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी रेणावीकर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत व मराठीभाषा गौरवगीत सादर केले. विविध शाळेतून मराठी विषय शिकविणार्या वर्षा पाठक, श्रुती कुलकर्णी, कल्पना काळोखे, हजारे सर, राहुल राळेभात, अलका जाधव, वैशाली माळवी, लबडे सर, शारदा वैद्य, रवींद्र पडवळ, महादेव गर्दे, स्वाती कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी यांचा डॉ. कैलास दौंड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जयंत येलुलकर यांनी प्रास्ताविक केले. शारदा होशिंग यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अस्मिता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहल उपाध्ये यांनी आभार मानले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
या कार्यक्रमास माजी प्राचार्य व्ही. जी. जोशी, शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशनचे अमित झिरपे यांच्यासह रेणावीकर विद्यालयाचे शिक्षकांचे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment