Saturday, 23 March 2019

माळीवाडा शिवसेना शाखेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन


नगर । प्रतिनिधी - मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढाया करतांना अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरुन त्यांनी तत्कालीन साम्राज्यशाहींशी लढा दिला आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. जनतेची काळजी घेणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. आज त्यांच्या आदर्शवरच आपणास काम करायचे असून, जनतेच्या प्रश्नांसाठी लढले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपाचे डॉ.सुजय विखे यांनी केले.
माळीवाडा शिवसेना शाखेच्यावतीने शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास भाजपाचे डॉ.सुजय विखे व शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, शिवाजी कदम, परेश लोखंडे, संतोष गेनप्पा, जगन्नाथ आंबेकर, प्रफुल्ल सावंत, अप्पू बेद्रे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना शिवसेना उपनेते अनिल राठोड म्हणाले, त्याकाळी  आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदार आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार, किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजी महाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली आणि उत्तम शासकाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले. असा राजा पुन्हा होणे नाही. आपण त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालले पाहिजे, त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे, असे सांगितले.
याप्रसंगी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम आदीनी आपले मनोगत व्यक्त केले. यानिमित्त फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तोफा, मावळे, पोवाडा,  झेंडे यामुळे वातावरण शिवमय झाले होते.

No comments:

Post a Comment