नगर । प्रतिनिधी - भारतीय जनता पार्टी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या स्तरावर नगर लोकसभा मतदार संघातील उमेदवाराबाबत चाचपणी सुरु असल्याने नगर लोकसभा मतदार संघात नेमकी लढत कोणत्या दोन उमेदवारांमध्ये होईल याविषयी सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या मुंबई येथील कार्यक्रमात त्यांच्या उमेदवारीची शिफारस भाजपा संसदीय बोर्डाकडे करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. विखे यांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची उमेदवारी डावलली जाईल असे बोलले जाते. परंतु आयात विखेंच्या उमेदवारीस खा. गांधी समर्थकांचा विरोध आहे. एकूणच आजमितीला भाजपा स्तरावर नेमके उमेदवार सुजय विखे पाटील की, विद्यमान खासदार दिलीप गांधी याचा उलगडा होणे बाकी आहे.
भाजपाचा उमेदवार अद्याप अंतिम नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षस्तरावर आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. विखे यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षस्तरावर लोकसभेचे उमेदवार म्हणून आ.अरुण जगताप यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. राजकीय समीकरणांमध्ये शिवसेना-भाजपा यांच्यात झालेली युती ही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कायम राहण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर संग्राम जगताप यांनी आपली व्यूहरचना बदलली असून ते लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षस्तरावर सध्या आ.अरुण जगताप की आमदार संग्राम जगताप यापैकी कोणाला उमेदवारी द्यावयाची हा प्रश्न आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची नगर लोकसभेसाठी आ.अरुण जगताप यांच्या नावाला पसंती आहे.
एका बाजूला एकूणच लोकसभा निवडणुकीपासून बाजूला राहण्याचे प्रयत्न करणारे आमदार संग्राम जगताप यांनी युतीचे समीकरण लक्षात घेऊन लोकसभेसाठी स्वत: इच्छुक असल्याचे पक्षस्तरावर कळविले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस स्तरावर जगताप कुटुंबात नेमके कोणाला उमेदवारी द्यावयाची या विषयीचा निर्णय होणार आहे.
आमदार कर्डिलेंची खेळी
नगर शहराच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिलेले भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांची राजकीय समीकरणे ही नेहमीच बेरजेची ठरली आहेत. सामाजिकदृष्ट्या त्यांची प्रतिमा काय आहे, यापेक्षा राजकीयदृष्ट्या ती नेहमीच मोठी राहिली व त्यांचे राजकीय निर्णयही फायद्याचेच राहिलेत. आगामी विधानसभा लक्षात घेऊन व निवडणुकीतील शिवसेना-भाजपा युती लक्षात घेता त्यांच्या स्तरावरुन आ.संग्राम जगताप यांचा लोकसभेचा प्रस्ताव पुढे आल्याची चर्चा आहे.
No comments:
Post a Comment