नगर । प्रतिनिधी - तीन वेळा खासदार होऊनही भाजपने उमेदवारी डावलल्याने खा. दिलीप गांधी यांनी निवडणुकीतील पुढील भूमिका ठरविण्यासाठी रविवारी (दि. 24) दुपारी 1 वा. नगर शहरातील टिळक रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याचे मतदार संघातील सर्वच तालुक्यांतील कार्यकर्त्यांना निरोप पाठविण्यात आले आहेत.
पुन्हा नगर दक्षिण मतदार संघातून भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून खा. दिलीप गांधी गेल्या आठ दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून होते. आपल्यालाच उमेदवारी मिळेल, अशी आशा गांधी यांना होती. त्याचप्रमाणे गांधी यांच्या कार्यकर्त्यांनीही आशा सोडलेली नव्हती. मात्र भाजपने काल (गुरुवार) सायंकाळी उशिरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करुन नुकतेच भाजपमध्ये आलेले डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे गांधी समर्थक नाराज झाले आहेत. गांधी समर्थकांनी काल रात्री उशिरापर्यंत खा. गांधी यांच्या बंगल्यासमोर गर्दी केली होती. यावेळी खा. गांधी यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन निवडणुकीतील पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी (दि. 24) दुपारी एक वा. टिळक रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास उपस्थित राहण्याबाबत कार्यकर्त्यांना निरोप पाठविण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment