नगर । प्रतिनिधी - नगरकरांच्या जिव्हाळ्याचा व नगर शहरातील बहुचर्चित सक्कर चौक ते अशोका हॉटेलदरम्यान होणार्या चौपदरी उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 8) सकाळी 11 वाजता केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व विविध खात्यांच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत नागपूर येथून व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे केले जाणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त मार्केट कमिटीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील पटांगणात जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातून 3.08 किमीचा उड्डाणपुल व 40.600 किमी चारपदरी बायपास रस्त्याचे काम होणार आहे, अशी माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपमहापौर मालन ढोणे, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, सुवेंद्र गांधी, श्रीकांत साठे, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक प्रफुल दिवान आदी उपस्थित होते.
यावेळी खा. गांधी म्हणाले, आजपर्यंत माझ्यावर कोणी कितीही टीकाटिपण्णी केली तरी मी मतदारसंघाच्या विकासापासून अजिबात विचलीत झालो नाही आणि भविष्यात होणारही नाही. इतर राजकीय लोकांसारखे मी अन् माझ्या भाजपच्या नेत्यांनी शहरातील उड्डाणपुलाचे कोणतेही भूमिपूजन किंवा उद्घाटन केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अनेक वर्षापासून सतत पाठपुरावा केला. आज त्याला यश आले आहे. अनेकांनी या उड्डाणपुलाचे राजकारण केले. भाजप विरोधकांनी पत्रकबाजी करून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र विकासकामांसाठी राजकारण नाही तर मानसिकतेची गरज असते. भाजप सरकार नुसते बोलतच नाही तर करून दाखविते, त्याचे हे उदाहरण आहे. पुणे-नगर हायवे शहरातून गेला आहे. सन 2006 मध्ये या हायवेचा विस्तार झाला. चेतक एन्टरप्राईजेस या ठेकेदाराकडे त्याचे काम होते. शिरूर ते नगर रस्त्याच्या कामात 70 कोटी रुपयांचा एकेरी उड्डाणपूल हा ठेकेदार करणार होता. सध्याचे सगम हॉटेल ते नेवासकर पंपापर्यंतचा हा उड्डाणपूल होणार होता. तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दोनदा उड्डाणपुलाचे भूमिपूजनही केले. मात्र त्यात पुढे राजकीय हस्तक्षेप झाला. ठेकेदाराला मारहाण झाली. त्यामुळे त्याने काम सुरू होण्यापूर्वीच सोडले. राजकीय श्रेयवादात स्थानिक नेत्यांनी तीनदा नारळ फोडला. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मला कौल दिला. खासदार झाल्यानंतर उड्डाणपुलाचा विषय हातात घेतला, तो मार्गी लागत नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवला. माझ्या त्यावेळच्या खासदारकीच्या काळात केंद्रात आणि राज्यातही काँग्रेस आघाडी सरकार होते. त्यामुळे सरकार दरबारी दाद मिळाली नाही. ती पाच वर्षे वाया गेली. मात्र 2014 साली केंद्रात सत्तांतर होऊन भाजपचे सरकार विराजमान झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या मंजुरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. नगर शहरातून 222 क्रमांकाचा विशाखापट्टणम नॅशनल हायवे गेला असल्याने मंत्री गडकरी यांनी या रस्त्यासाठी साडेचारशे कोटी रुपये मंजूर केले होते. त्याच वेळेस त्यांचे या उड्डाणपुलाकडे लक्ष वेधले. या विशाखापट्टणम रस्त्याच्या कामातून नगर शहराचा उड्डाणपूल व्हावा यासाठी पाठपुरावा केला. भाळवणी येथे या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी स्वत: मंत्री नितीन गडकरी आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये बसून त्यांना नगरचे रस्ते दाखविले. शहरातील रस्त्याची दुरवस्था दाखविली. शहरात चांगले रस्ते करण्यासाठी त्यांना हे सगळे रस्ते नॅशनल हायवेकडे वर्ग करण्यास गळ घातली. त्यांनी ती तत्काळ मंजूर करून रस्त्यांचा व उड्डाणपुलाचा डीपीआर करण्यासाठी अधिकारी नगरला पाठविले. सुरूवातीला साडेसातशे कोटी रुपयांचा निधी होता. त्यातून सक्कर चौक ते डीएसपी चौकदरम्यान उड्डाणपूल प्रस्तावित होता. पूर्वीच्या चेतक कंपनीकडून उभारण्यात येणार्या उड्डाणपुलाचा 70 कोटी रुपयांचा निधी वगळून हा रस्ता नॅशनल हायवेकडे वर्ग करायचा होता. बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी फक्त कागदी घोडे नाचविले अन् वेळकाढूपणा केला. सरकारला तसे कळविण्याची तसदीही घेतली नाही. दीड वर्षाच्या विलंबानंतर चेतककडून काम वगळल्याचे पत्र दिले गेले. त्यानंतर शासनाकडून एनओसी आली ती केंद्राकडे पाठविली. या दीड वर्षाच्या काळात विशाखापट्टणम् नॅशनल हायवेचे काम वाढत गेले अन् नॅशनल हायवेसाठी दिलेले साडेसातशे कोटीही अपुरे पडले. पर्यायाने नगरच्या उड्डाणपुलास केवळ साडेतीनशे कोटी मिळू शकले. या निधीतून होईल तितका उड्डाणपूल करून घ्या, पुन्हा निधी देतो असे आश्वासन मंत्री गडकरी यांनी दिले आहे. पुढच्या टप्प्यात आणखी निधी मिळणार आहे. त्यातून थेट महापालिका इमारतीपर्यंत उड्डाणपूल करण्यासाठी वचनबध्द आहे. सक्कर चौक ते अशोका हॉटेल दरम्यान चौपदरी उड्डाणपुलाच्या कामासाठी 280 कोटी केंद्र शासनाकडून तर राज्य शासनाकडून 52 कोटी मिळाले आहेत. आपल्या कार्यकाळात नुसते बोललो नाही तर करून दाखविले अन् प्रत्यक्ष उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही करू शकलो याचे समाधान आहे.
No comments:
Post a Comment