नगर । प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीत आपण कोणत्या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक रिंगणार उतरणार या संदर्भातील अंतिम निर्णय आगामी दोन दिवसांत घेणार असल्याचे नगर लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच पुढे ते म्हणाले की, जनता माझ्यासोबत आहे हे महत्त्वाचे. त्यामुळे कोणाच्याही साथीची अपेक्षा न ठेवता निवडणूक लढवणार आहे.
डॉ.सुजय विखे हे आज (दि. 6) वैयक्तिक कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभा उमेदवारीच्या अनुषंगाने आपली भूमिका स्पष्ट केली.
गेल्या तीन वर्षापासून मी तयारी करतो आहे. सर्वसामान्य लोकांना समोर ठेवून माझे कार्य चालू आहे. गेल्या पंधरा वर्षात कोणतेही ठेास काम नगर शहरात होवू शकलेले नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी कामांची उद्घाटने केली जात असल्याचे जनता जवळून पाहते आहे. मी विकासकामे करेल असा विश्वास जनतेमध्ये असेल तरच ते मला मतदान करतील. सबका साथ सबका विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून निवडणूक रिंगणात उतरणार आहे. स्वतःची ओळख निर्माण करण्यात मी यशस्वी झालो आहे. त्यामुळे आई-वडिलांना माझ्या प्रचारासाठी अजूनतरी पुढे यावे लागले नाही. गेल्या सहा महिन्यांपासून प्रसारमाध्यमांनी माझे नांव महाराष्ट्रभर पोहचविण्याची कामगिरी बजावली. निवडणुकीसाठी माझ्याशी कोणत्याही पक्षाने अद्याप संपर्क केला नाही. येत्या दोन दिवसांत मी माझा अंतिम निर्णय जाहीर करणार आहे. पाण्याची पातळी वाढवणे व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. औद्योगिक विकासावर विशेष भर देण्याचा आमचा मानस आहे असेही विखे म्हणाले.
No comments:
Post a Comment