नगर । प्रतिनिधी - महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी प्रथमच बहुजन समाजवादी पार्टीला संधी मिळाली आहे. भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पाठिंब्यावर बसपाचे नगरसेवक मुद्दस्सर शेख यांची आज मनपाच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाली. त्यांना एकूण दहा मते मिळाली असून त्यांचा विजय झाला. तर सेनेचे योगीराज गाडे यांना सहा मते मिळाली असून त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली.
स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी सेनेचे योगीराज गाडे, राष्ट्रवादीचे अविनाश घुले व बसपाचे नगरसेवक मुद्दस्सर शेख या तिघांनी अर्ज दाखल केले होते. आज सोमवारी सकाळी 11.15 मिनिटाने मनपाच्या स्थायी समितीच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. सर्वप्रथम या अर्जांची छाननी झाली. छाननीत तीनही उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यानंतर माघारीसाठी पंधरा मिनिटांची मुदत देण्यात आली होती. या दरम्यान राष्ट्रवादीचे उमेदवार अविनाश घुले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सेनेचे योगीराज गाडे व मुद्दस्सर शेख यांचे उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांच्यामध्ये सरळ-सरळ लढत झाली. या लढतीत शेख यांना दहा मते मिळाली. त्यामध्ये भाजप-3, राष्ट्रवादी-5, काँग्रेस-1, बसपा-1 असे मिळून दहा मते शेख यांना मिळाली आहेत. तर योगीराज गाडे यांना सेनेच्याच सर्व सहा सदस्यांनी मते दिली. भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पाठिंब्यावर बसपाचा सभापती नगरच्या इतिहासात पहिल्यांदाच झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान महापौर निवडणुकीत सेनेविरोधात झालेली आघाडी स्थायीतही कायम राहिली. भाजपने शेख यांना दिलेला शब्द पाळला.शेख सभापती झाल्याने त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
No comments:
Post a Comment