नगर । प्रतिनिधी - तिथीनुसार नगर शहरात उद्या (शनिवार) होत असलेल्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेच्या सुमारे 28 पदाधिकार्यांना 22 ते 24 मार्चदरम्यान शहरबंदी केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘आम्हाला तडीपार करा, नाहीतर तुरुंगात टाका, शनिवारी शिवजयंती मिरवणूक काढणारच’, असा ठाम निर्धार हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाप्रमुख दिगंबर गेंट्याल यांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी केलेल्या शहरबंदीच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर गेंट्याल यांनी प्रसिध्दीपत्रक काढले आहे.पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती व प्रभू श्रीराम यांची जयंती (श्रीरामनवमी) हे दोन्ही उत्सव आम्ही मोठ्या उत्साहात साजरे करतो. या महोत्सवांकरिता बंदोबस्त मागितला असता हे सरकार देत नाही. शिवाय मिरवणुकीला परवानगी नाकारली जाते. परवानगी नसल्याचे पत्र महोत्सवाच्या दिवशी 2-3 तासाअगोदर तोंडी नाकारले जाते. त्यामुळे न्यायालयातही दाद मागता येत नाही. आम्ही छत्रपती शिवराय व प्रभू श्रीरामाचे भक्त आहोत. सरकारने परवानगी नाकारली तरीही आम्ही मिरवणुका काढू.
सरकारमध्ये बसलेले सत्ताधीश त्यांचे सरकार नसलेल्या राज्यात रामनवमी साजरी करण्याचा आग्रह करतात. मात्र, जिथे सत्ता आहे त्या महाराष्ट्रात रामनवमी मिरवणूक काढू देत नाहीत. पश्चिम बंगालमध्ये रामनवमी साजरी करण्यासाठी ही मंडळी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावतात. हा विरोधाभास अनाकलनीय आहे. गेली 5 वर्षे सरकारने परवानगी नाकारली. आम्ही महोत्सव साजरे करायचे, मग सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल करायचे. 3-4 गुन्हे दाखल झाले की आम्हाला दरोडेखोरांची वागणूक देऊन तुरुंगात तरी धाडायचे नाही तर तडीपार तरी करायचे, असा पायंडा या सरकारने आणि परिहार्यतेने सरकारी यंत्रणेने पाडला आहे. तसेच आमच्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारला आहे. त्यामुळे विद्यमान सरकार खरोखरीच हिंदूहिताचे आहे का, असा प्रश्न आम्हाला पडतो. आम्हाला तडीपार करा नाही तर तुरुंगात टाका, शिवजयंती आणि रामनवमी मिरवणूक काढणारच, असा निर्धार गेंट्याल यांनी व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment