नगर । प्रतिनिधी - भारतीय जनता पार्टीकडून नगर दक्षिणच्या जागेवर लोकसभा मतदारसंघासाठी एकदम नवा चेहरा देण्याचा विचार सुरू होता आणि त्यातच सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करुन जवळपास आपली उमदेवारी निश्चित केली होती. काल गुरुवारी सायंकाळी सुजय विखे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून नगर दक्षिणच्या जागेसाठी राष्ट्रवादीचे संग्राम जगातप यांच्या विरुध्द भाजपाचे सुजय विखे अशीच सरळ लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपाने विखे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केल्यानंतर विखे यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. जिल्हाभरात विविध ठिकाणी फटाके फोडून त्यांच्या उमेदवारीचे स्वागत करण्यात आले.
नगर जिल्ह्याला धक्काशैलीचे राजकारण नवीन नसल्याने शेवटच्या घटकेपर्यंत म्हणजेच उमेदवारी जाहीर होईपर्यंत उमेदवारी कुणाला मिळणार याची उत्सुकता भाजप कार्यकर्त्यांना होती. त्यातच विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना उमेदवारी देऊ नये यासाठी भाजपातील एक गट सक्रिय झाला होता. सक्रिय झालेला हा गट आता विखे यांची उमेदवारी निश्चित झाल्याने एक प्रकारे जिंकला आहे. मात्र, आता त्यांच्यापुढे निवडणुकीचे आव्हान उभे ठाकले असून भविष्यात गांधी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिलीप गांधी यांनी जर पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन विरोधी पक्षातील उमेदवाराला मदत केली तर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील असाही प्रश्न आता जिल्ह्यात चर्चिला जात आहे.
उमेदवारीसाठी गांधी यांनी पहिल्या टप्प्यात पक्षश्रेष्ठींची भेट घेवून दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न केला. त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही असे आता म्हणता येईल. नगर दक्षिणसाठी प्रदेशपातळीवरूनच गेल्या वर्षभरापासून चाचपणी सुरू होती. त्यात गांधींना पक्षामधूनच विरोध होता, तो काही ठिकाणी छुपा तर काही ठिकाणी उघड अशी अवस्था होती. ती पक्षश्रेष्ठीनी समोर ठेवूनच नवीन चेहर्यासाठी तयारी केली होती. सुजय विखे यांच्या रुपाने त्यांना नवीन चेहरा मिळाला आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या या मतदारसंघावर भाजपाने आतापर्यंत दोन ते तीन वेळेस बाजी मारली आहे. सन 2014 मध्ये पुन्हा हा मतदारसंघ मोठ्या मताधिक्याने भाजपाकडे आला होता. आता तो कायम रहावा यासाठी पूर्ण ताकदीने सुजय विखे प्रयत्न करतील.
नगर दक्षिणच्या या मतदारसंघात भाजपाची ताकद मोठी आहे. भाजपाचे तीन आमदार नगर दक्षिणमध्ये असल्याने भाजपला कितपत यश मिळणार हे देखील समोर येणार आहे. उमेदवार देऊन मतदारसंघ कायम ठेवायचा या विचारातूनच पक्षाबाहेरच्या पण प्रभावी असणार्या उमेदवाराबाबत विचार करण्यात आला असल्याने आता विखे यांना भाजपाचे किती नेते आणि किती कार्यकर्ते स्वीकारणार हा देखील प्रश्न आहे. विखे यांच्या बरोबर जुने जाणते भाजपाचे ज्येष्ठ पालकमंत्री राम शिंदे, प्रा.भानुदास बेरड, अॅड.अभय आगरकर,अॅड.अच्युतराव पिंगळे हे असल्याने त्यांना येणार्या अडचणीवर सहज मात करता येईल, अशी देखील चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
No comments:
Post a Comment