Saturday, 23 March 2019

बेरोजगार दिव्यांगांचा आशाकिरण


नगर । प्रतिनिधी - मूकबधीर-अस्थिव्यंग-अल्पदृष्टी दिव्यांगांचे बेरोजगारीचे प्रमाण कमी व्हावे म्हणून अनामप्रेम मागील 5 वर्षापासून काम करीत आहे. या प्रकारच्या दिव्यांग प्रौढ मुला-मुलींना नोकरीपूर्व प्रशिक्षण देणे, त्यांना प्रशिक्षित करून कंपन्या, मॉल्स, रिटेल आणि एम.आय.डी.सी मध्ये नोकर्‍या उपलब्ध करून देण्याचे मिशन स्नेहालय संचलित अनामप्रेम संस्था चालवत आहे. हे नोकरी प्रशिक्षण केंद्र 2 महिन्यांचे मोफत निवासी ट्रेनिंग देते. यानंतर या दिव्यांगांना खाजगी उद्योग क्षेत्रात नोकरी मिळवून देते. अनामप्रेमच्या नोकरी केंद्रामुळे 400 दिव्यांग स्वावलंबी झाले आहेत. याच केंद्राच्या 20 व्या प्रशिक्षण केंद्राच्या कोर्सची प्रवेशपूर्व मुलाखत येत्या 2 एप्रिल रोजी आयोजित केली आहे. येत्या 2 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत नगर शहरातील अनामप्रेमच्या गांधी मैदान, स्नेहालय भवनमागे, अहमदनगर या कार्यालयात या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. गरजू-होतकरू दिव्यांग मुला-मुलींनी याकरिता प्रवेश घ्यावा, असे आवाहन अनामप्रेमच्या वतीने करण्यात ाले आहे.
दोन महिने चालणारे हे प्रशिक्षण नगर शहरापासून 15 किमी अंतरावर असणार्‍या  निंबळक गावातील सत्यमेव जयते ग्राम प्रकल्पातील रविनंदा संकुलात दिले जाते. पूर्णतः मोफत असणार्‍या या प्रशिक्षण केंद्रातून इंग्रजी संभाषण कौशल्य, संगणक प्रशिक्षण, खाजगी उद्योग क्षेत्रात लागणारी विविध कौशल्ये, व्यक्तिमत्व विकास आदी घटक शिकवले जातात. हैद्राबाद येथील युथ फॉर जॉब या सामाजिक कंपनीद्वारे हे प्रशिक्षण दिले जाते. अत्यंत प्रशिक्षित स्टाफ याकरिता अनामप्रेमच्या प्रकल्पात उपलब्ध आहे. सांकेतिक भाषा तज्ञ, इंग्रजी व व्यक्तिमत्व विकास अभ्यासक, प्लेसमेंट ऑफिसर आदी स्टाफ युथ फॉर जॉबच्या मार्गदर्शनात अहोरात्र कार्यरत आहे. दिव्यांग मुला-मुलींच्या रोजगारासाठी संगणक शिक्षणाचे महत्व ओळखून अनामप्रेमने पूर्णतः व अल्पशा अंध मुला-मुलींना देखील संगणक प्रशिक्षण कोर्स सुरु केला आहे.  गरजू-होतकरू बेरोजगार अपंग-अस्थिव्यंग-मुकबधीर-अंशतः अंध मुला-मुलींसाठी प्रवेशपूर्व मुलाखती घेऊन या प्रकल्पात प्रवेश दिला जात आहे. अनामप्रेम दिव्यागांचे शिक्षणातून पुनवर्सनाचे माध्यम बनावे असा स्नेहालयचा प्रयत्न आहे.
 गेल्या 3 वर्षामध्ये अनामप्रेमच्या या  ‘युथ फॉर जॉब’नोकरी प्रशिक्षण केंद्र 450 दिव्यांगांना प्रशिक्षित केले आहे. प्रशिक्षित दिव्यांगांपैकी 400 दिव्यांग मुला-मुलींना रोजगार मिळाला असून ते स्वावलंबी झाले आहेत. त्यातील अनेक दिव्यांग विवाहित झाले असून उत्तम संसार ते करीत आहेत. नगर, पुणे, मुंबई, औरंगाबाद औद्योगिक वसाहतीत या प्रशिक्षित दिव्यांगांना नोकर्‍या मोठ्या प्रमाणावर मिळत आहेत. स्नेहालय परिवाराने येथे दिव्यांगांसाठी टेलरिंग उत्पादन युनिट देखील सुरु केले आहे. सर्व प्रकारच्या बेरोजगार दिव्यांगांना रोजगार कसा मिळेल यावर अनामप्रेम टीम काम करीत असून नगर जिल्ह्यातील प्रत्येक बेरोजगार दिव्यांग रोजगारक्षम होण्यासाठी आगामी काळात अनामप्रेमचे प्रयत्न आहेत. याकरिता या विषयावर डॉ.प्रकाश शेठ, डॉ. सायली सोमण, इंजिनियर अजित माने, सामाजिक कार्यकर्ते दीपक बुरम, रामेश्वर फटांगडे, उमेश पंडूरे, अजित कुलकर्णी आदी स्नेहालय कार्यकर्ते  संशोधन करीत आहेत. अधिक माहितीसाठी 7350013805/7350640303 या क्रमांकावर गरजू-बेरोजगार दिव्यांग मुला-मुलींनी संपर्क साधावा. प्रशिक्षणातून स्वत:चे जीवन बदलावे, बेरोजगार दिव्यांगापर्यंत ही केंद्राची माहिती पोहचवण्याचे आवाहन अनामप्रेमने केले आहे.

No comments:

Post a Comment