Monday, 18 March 2019

जि.प.कर्मचारी सोसायटीच्या कर्जावरील व्याजदरात कपात : शशिकांत रासकर


नगर । प्रतिनिधी - जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत कर्जावरील व्याजदर आणखी एक टक्क्याने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील चार वर्षात सोसायटीने सभासदहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. यातूनच कर्जावरील व्याजदर 4 वर्षात 2 टक्के कमी करून तो 12 टक्क्यावरून 10 टक्क्यापर्यंत आणण्यात आला आहे. नव्या आर्थिक वर्षापासून दि.1 एप्रिलपासून नवीन कमी झालेले व्याजदर लागू होतील, अशी माहिती संस्थेचे चेअरमन शशिकांत रासकर व व्हाईस चेअरमन मोहन जायभाये यांनी दिली.
या निर्णयाबाबत अधिक माहिती देताना चेअरमन रासकर यांनी सांगितले की, सभासदांना दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता जवळ जवळ झाली असून, भविष्यात संस्थेचे सर्व व्यवहार ऑनलाईन करण्याचा मानस आहे. संचालकांनी खर्चात काटकसर करून संस्थेला अधिकाधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. कर्जावरील व्याजदर कमी करण्याची सभासदांची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करणारा निर्णय सर्व संचालकांनी एकमताने घेतला आहे. याचा सभासदांना मोठा लाभ होणार आहे.
व्हाईस चेअरमन जायभाये म्हणाले की, जिल्हा परिषद कर्मचार्यांसाठी सोसायटी कामधेनू आहे. सभासदाला केंद्रस्थानी ठेवून संचालक मंडळ अतिशय पारदर्शी व सर्वोत्तम कारभार करीत आहे. संस्थेच्या उत्कर्षात सर्व सभासदांच्या सहकार्याचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच सभासदांना फायदेशीर ठरतील असे अनेक चांगले निर्णय घेता आल्याचे समाधान आहे. येणार्या काळातही सभासदांच्या चांगल्या सूचनांचा विचार करून त्यानुसार आवश्यक ते निर्णय घेण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
याप्रसंगी संस्थेचे संचालक संजय कडूस, सुभाष कराळे, सोपान हरदास, संजू चौधरी, अरूण शिरसाठ, हरि शेळके, राजाबापू पाठक, नारायण बोराडे, अशोक काळापहाड, विलास वाघ, वालचंद ढवळे, संतोष नलगे, अरूण जोर्वेकर, ज्ञानदेव जवणे, भरत घुगे, प्रताप गांगर्डे, उषा देशमुख, इंदू गोडसे विलास शेळके, राहुल कांबळे, व्यवस्थापक अविनाश शिदोरे, उपव्यवस्थापक राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment