Saturday, 2 March 2019

अर्बन बँकेच्या सभासदांना अडीचशे रूपये ठेव पावती


नगर । प्रतिनिधी - नगर अर्बन बँकेच्या शतक महोत्सव प्रित्यर्थ बँकेच्या सभासदांना 250 रुपयांची ठेव पावती भेट देण्याच्या प्रस्तावाला भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. महाशिवरात्रीच्या शुभमुहुर्तावर सोमवारी (दि.4) सकाळी 11 वाजता केडगाव इंड्रस्ट्रीयल इस्टेट येथील बँकेच्या नूतन डाटा सेंंटर येथे पालकमंत्री राम शिंदे व उपसभापती विजयराव औटी यांच्या हस्ते सभासदांना समारंभपूर्वक वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन खा.दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
आमदार शिवाजीराव कर्डीले, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर सौ.मालनताई ढोणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा वितरण सोहळा पार पडणार आहे. यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन अशोक कटारिया, नवनीत सुरपुरिया, अनिल कोठारी, दीपक गांधी, किशोर बोरा, मनेष साठे, मुख्याधिकारी नवीन गांधी, प्रमुख व्यवस्थापक सतीश रोकडे आदी उपस्थित होते.
खा. गांधी म्हणाले, मुदत ठेव वितरण समारंभ बँकेच्या सर्व 48 शाखांमध्ये सोमवारी एकाच वेळेस सकाळी 11 वाजता स्थानिक आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच शाखास्तरावरील मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येईल. बँकेचा शतकीय प्रवासाचा आनंद सभासदांबरोबर घ्यावा या हेतूने आम्ही 31 मार्च 2010 रोजी सभासद असलेल्या एकुण 88 हजार 818 इतक्या सभासदांना दामदुप्पट योजनेची ठेव पावती देण्याचा ठराव करुन त्या रकमेची तरतूदही करुन ठेवली होती. त्याला भारतीय रिझर्व्ह बँकेची परवानगी घेणे आवश्यक होते. त्यानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेच्या या महत्वपूर्ण निर्णयाला परवानगी दिली असून बँकेच्या सभासदांना ही पावती देण्यात येणार आहे. 
अर्बन बँक आज या आर्थिक वर्षातील सर्वात मोठी प्रगती करत आहे. 31 मार्च या वर्षाखेरीस बँक आपला टाळेबंद घोषित करीत आहे. ग्राहकांच्या प्रतिसादामुळे बँकेच्या ठेवी वाढण्या बरोबरच कर्जाची  वसुलीही वाढत आहे. राज्यात सध्या दृष्काळ सदृष्य परिस्थिती आहे. ग्रामीण भागात याची तीव्रता जास्त आहे. म्हणुन सोने तारण कर्जाचा व्याजदर साडेबारा वरुन साडेआकरा करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेवुन काही प्रमाणात दिलासा दिला आहे. तसेच बँकेने सर्वोत्तम ग्राहक अत्याधूनिक सेवा-सुविधांचा सातत्याने ध्यास घेतला असून बँकेच्या स्वमालकीचे थ्री टीयर डाटा सेंटर कोअर बँकींग यंत्रणा सुसज्ज झाली आहे. केडगांव येथील इंडस्ट्रीयल इस्टेट येथील शाखेचे नूतनीकरण केले असून बँकेला कॉर्पोरेट लूक दिला आहे. या शाखेमध्ये हे थ्री टीयर डाटा सेंटर पूर्ण झाले आहे. त्यामुळे अत्यंत आधुनिक बँकींग करणे आमच्या परिवारातील सभासद, कर्जदार, ठेवीदार खातेदारांना सुलभ होणार आहे, असेही खा. गांधी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment