नगर । प्रतिनिधी - सुरक्षा सप्ताहानिमित्त सर्वांनी एकत्रित येऊन सुरक्षा, पर्यावरण, व पाणी याविषयी कायमस्वरूपी देशाला आदर्श देणारा कृतियुक्त आराखडा तयार करावा, असे मत आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले
औद्योगिक सुरक्षितता व आरोग्य विभाग अहमदनगर व परस्पर सहाय्यता गट यांच्या संयुक्त विद्यमाने एमआयडीसीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित जनजागृती रॅलीचा शुभारंभ आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अहमदनगर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक एस.के देशमुख, एल अँड टीचे मुख्य व्यवस्थापक अरविंद पारगावकर, सी.जी.पॉवरचे गौतम सुवर्णपाठकी, अँडॉर वेल्डिंगचे सतीश भट, सन फार्माचे गिरीश भुंजे, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एपीआय बोरसे, फायर विभागाचे मिनील सोनवणे, एक्साईड बॅटरीचे सुब्रो सिन्हा, व्ही. श्रीनिवासन आदी उपस्थित होते.
यावेळी अरविंद पारगावकर म्हणाले की, प्रत्येकाची सुरक्षा ही अत्यंत महत्वाची असून अपघातामुळे एका व्यक्तीचे नव्हे तर संपूर्ण परिवाराचे व राष्ट्राचे नुकसान होते. त्यासाठी औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा महत्वाची आहे.रॅलीच्या व विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून याविषयी जागृती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकात एस.के देशमुख, म्हणाले की, या 48 व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त अँडॉर वेल्डिंग कंपनी, परिसरात आयोजित कार्यक्रमात सहभागी सर्व कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी केलेले सहकार्य अत्यंत मोलाचे आहे. फक्त एक दिवस सुरक्षा दिन साजरा करून चालणार नाही तर वर्षातले 365 दिवस सुरक्षेला महत्व आहे. सुरक्षा साधनांचा वापर ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे याची जाणीव या उपक्रमातून निर्माण होईल.
पोपटराव पवार यांच्या हस्ते ध्वजारोहन करून व सामुहिक आरोग्य व सुरक्षिततेची शपथ यावेळी घेण्यात आली. या निमित्त आयोजित कार्यक्रमात हेल्मेट महत्व लघुनाटिका, सुरक्षागीत, पोवाडा तसेच सुरक्षा साधने वापरून फॅशन शोसारखा रॅम्पवॉक सादर करण्यात आला. शोलेतील प्रसिद्ध खलनायक गब्बर सिंगवरील सुरक्षे विषयी नाटिका पाहून उपस्थितांनी त्यास मनसोक्त दाद दिली. विविध कंपन्यांचे कामगार, अधिकारी, सुरक्षारक्षकांच्या सहभागाने संपूर्ण एमआयडीसी परिसरात या रॅलीमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
No comments:
Post a Comment