नगर । प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे काँग्रेसमधून पक्षात दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील भाजपमध्ये गावपातळीपासून उभी फूट पडली आहे. डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध वाढत चालला असून भाजपच्या तालुकास्तरावरील पदाधिकार्यांनी पत्रके काढून पुन्हा खा. दिलीप गांधी यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
डॉ. सुजय विखे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशावेळी भाजपकडून डॉ. विखे यांनाच नगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी शिफारस करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे डॉ. विखेंची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. विखेंनी नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. मात्र, उमेदवारीवरून भाजपमध्ये उभी फूट पडल्याचे पहायला मिळत आहे.
डॉ. विखे उमेदवारीच्या दृष्टीने सुमारे दोन वर्षांपासून जिल्ह्यात संपर्क अभियान राबवत आहेत. डॉ. विखे यांनी गावा-गावात सभा घेऊन भाजपच्या नेत्यांवर तोंडसुख घेतले. त्यामुळे साहजिकच भाजपच्या गाव, तालुका पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये डॉ. विखेंबद्दल अगोदरच नाराजीचा सूर होता. त्यातच डॉ. विखे भाजपमध्ये आले. त्यांना भाजपची उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात असल्याने गाव, तालुकापातळीवरील पदाधिकार्यांमध्ये असंतोष वाढला आहे. भाजपच्या पदाधिकार्यांनी आता पत्रके काढून डॉ. विखेंच्या उमेदवारीला जाहीर विरोध दर्शवत खा. दिलीप गांधी यांना पुन्हा उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. या प्रकाराने भाजपमध्ये उभी फूट पडल्याचे पहावयास मिळत आहे.
नगरची भाजप झाली काँग्रेस-राष्ट्रवादी प्रणित!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा केली होती. मात्र नगर जिल्ह्याची काँग्रेस-राष्ट्रवादी प्रणित भाजपाकडे वाटचाल सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. नगर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहेत. त्यातील आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. स्नेहलता कोल्हे या काँग्रेसमधून तर आ. मोनिका राजळे, आ. शिवाजी कर्डिले हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले आहेत. माजी मंत्री बबनराव पाचपुते हेही पूर्वी राष्ट्रवादीत होते. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा अपवाद असून ते पूर्वीपासून भाजपमधीलच आहेत. तर खा. दिलीप गांधी हे पक्षात गेल्या 45 वर्षांपासून कार्यरत असून, एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. मात्र आता खा. गांधी यांना डावलून काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले डॉ. सुजय विखे यांना लोकसभेची उमेदवारी दिली जात असल्याने नगरची भाजप ही काँग्रेस-राष्ट्रवादी प्रणित झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
भाजप पदाधिकार्यांची मेळाव्याकडे पाठ
नाशिकमध्ये भाजपचा नुकताच विभागीय मेळावा झाला. या मेळाव्यास नगर जिल्ह्यातील जिल्हा भाजप व भाजयुमोचा एकही पदाधिकारी गेला नाही. यामागे डॉ. सुजय विखेंचा पक्षप्रवेश व संभाव्य उमेदवारीची किनार असल्याचे बोलले जात आहे. पुढे अशीच परिस्थिती राहिल्यास भाजपचे पदाधिकारी डॉ. सुजय विखे यांचे काम करतील की नाही, याबाबत साशंकताच आहे.
No comments:
Post a Comment