Tuesday, 22 January 2019

आम्ही मंजूर केलेल्या कामांची निविदा प्रक्रिया तातडीने राबवा


नगर । प्रतिनिधी - मनपाकडे व्याजाच्या स्वरूपात असलेल्या पैशातून 9.10 रूपये वापरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यातून सीना नदीवरील पुलाच्या कामासह टीव्ही सेंटर ते भिस्तबाग महाल व तारकपूर ते सर्जेपुरा एस.टी. वर्कशॉपपर्यंतचा रस्ता विकसीत करण्यासाठीही निधी उपलब्ध झालेला आहे. मात्र, मनपा प्रशासन अद्यापही ही कामे मार्गी लावण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. या कामांना निधी उपलब्ध असूनही निविदा प्रसिध्द करण्याचा प्रशासनाला विसर पडला आहे. त्यांनी तातडीने निविदा प्रक्रिया राबवावी अशी मागणी निवेदनाद्वारे माजी महापौर सुरेखा कदम यांनी आयुक्तांकडे केली आहे. 
निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना महापौरपदाच्या माध्यमातून योजनांवरील व्याजाच्या शिल्लक रकमांमधून शहरातील कामांसाठी निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले. शासनाकडे पाठपुरावा करून व्याजाच्या शिल्लक रकमेपैकी 9.10 कोटी रूपये वापरण्यास नगरविकास विभागाकडून महापालिकेला मंजुरीही मिळालेली आहे. यात तोफखाना पोलीस स्टेशन ते भिस्तबाग चौक ते भिस्तबाग महाल या उपनगरातील प्रमुख रस्त्यांसाठी सुवर्णजयंती नगरोत्थान निधीवरील व्याजातून 3.46 कोटी रूपये मंजूर झाले आहेत. सर्जेपुरा एस.टी वर्कशॉप ते तारकपूर असा नवीन रस्ता विकसीत करण्यासाठी 2.46 कोटी रूपये मंजूर झाले आहेत. जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतील शिल्लक व्याजाच्या रकमेतून 22 लाख रूपये सर्जेपुरा ते फलटण पोलीस चौकी रस्त्यासाठी मंजूर झाले आहेत. हा सर्व निधी महापालिकेकडे उपलब्ध आहे. शासनाकडून मंजूरी प्राप्त होऊन दीड महिना झाला आहे. मात्र, अद्यापही या कामासाठी प्रशासनाने कारवाई सुरू केली नाही. या कामासाठी तात्काळ निविदा प्रक्रिया राबवावी. सदरचे रस्ते अतिक्रमणमुक्त करून महापालिकेच्या ताब्यात घ्यावेत व लवकरात लवकर रस्त्याची कामे पूर्ण करावीत, असे माजी महापौर कदम यांनी निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment