Tuesday, 29 January 2019

सुभाषचंद्र बोस यांच्यामुळेच इंग्रजांना भारत सोडावा लागला ः सिन्हा


नगर । प्रतिनिधी - आपल्या देशाला अहिंसेच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळाले आहे, असे शिकवले गेले. मात्र हे जगातील सर्वात मोठे खोटे आहे. आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामुळेच इंग्रजांनी भारत सोडला, असे 1956 साली ब्रिटनच्या पंतप्रधानांनी कबूल केले आहे. स्वातंत्र्याचे पूर्ण श्रेय सुभाषबाबूंना जाते. देशाला स्वातंत्र्य अहिंसेने नाही तर आर्म स्ट्रगलने मिळाले आहे आणि हे आर्म स्ट्रगल नेताजींची देण आहे. भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी बाहेरून आक्रमण करावे लागेल हे नेताजींनी जाणले आणि त्यांनी हिटलरसारख्या महान  नेत्याशी मैत्री करून फौज उभारली, असे प्रतिपादन निवृत्त मेजर जनरल एस. पी. सिन्हा यांनी केले.
भारत भारतीच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त हॉटेल संजोग येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतमाता पूजन, देशभक्तीवर व्याख्यान, विविध राज्यातील खाद्यपदार्थांचे फूड फेस्टीव्हल, तसेच विविध राज्यातील पारंपारिक नृत्यांचे सादरीकरण या कार्यक्रमांना नगरच्या रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी एस. पी. सिन्हा, प्रसिद्ध अभिनेते व संस्कार भारती कोकण विभागाचे अध्यक्ष विक्रम गोखले यांच्या हस्ते भारतमाता पूजन झाले. या कार्यक्रमास भारत भारतीचे संस्थापक विनय पत्राळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी भारत भरतीचे अध्यक्ष दामोधर बठेजा, उपाध्यक्ष राजू लक्ष्मण, राजेंद्र अग्रवाल, खा. दिलीप गांधी, आ. शिवाजी कर्डिले, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे उपस्थित होते.
सिन्हा पुढे म्हणाले, आझाद हिंद सेनेमध्ये कोणताही जातिवाद, प्रांतवाद, धर्मवाद नव्हता. संपूर्ण फैजमध्ये देशभक्ती जागृत केली होती. एवढ्या मोठ्या ब्रिटीशांच्या फौजेला फक्त 66 हजार आझाद हिंद सेनेने तोंड दिले. त्यामुळे त्यांना भारत सोडावा लागला. महिलांमध्ये देशभक्ती जागृत करून त्यांनी महिलांचीही फौज उभारली. अशा महान नेत्याचा मृत्यू हेलिकॉप्टर अपघातात झाल्याचे खोटे आहे. रशियाच्या मदतीने पंडित नेहरूंनी त्यांना मारण्याचा कट करुन हत्या केली. आपल्या पाठ्यपुस्तकातील इतिहास बदलून काहींनी हा इतिहास दूषित केला आहे. मात्र स्वातंत्र्याचा खरा इतिहास नव्या पिढीपुढे आला पाहिजे. आपली भारतीय संस्कृती ही मोठ्या प्रमाणात धोक्यात आली आहे. यासाठी महिलांनी जिजामाता होऊन शिवाजी महाराजांसारख्या वीर पुरुषांना जन्माला घालावे.
सूत्रसंचालन वीणा दिघे व अविनाश कराळे यांनी केले. कमलेश भंडारी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हरेष हरवानी, दिनेश छाबरिया, चेतन जग्गी, चंद्रशेखर आरोळे, अनिल धोकरीया, हरिष रंगलानी, मोहन मानधना, बाबूशेठ टायरवाले, रामेश्वर बिहाणी, कमलेश भंडारी, मुन्ना आगरवाल, राजू ढोरे, प्रदीप पंजाबी, के. के. शेट्टी, अशोक मवाळ, राजेंद्र जोशी, वाल्मिक कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, कॅप्टन रावत, गणेश गायकवाड, आदेश चंगेडिया, सतीश हिंदाणी यांनी परीश्रम घेतले.

No comments:

Post a Comment