नगर । प्रतिनिधी - प्रजासत्ताक दिनानिमित्त रोबोटिक सेंटरच्या सावेडी शाखेत अत्याधुनिक पध्दतीने ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा कारागृहाचे अधिक्षक नवनाथ सावंत व सामाजिक कार्यकर्ते सुवालाल शिंगवी यांच्या हस्ते कळ दाबून ध्वज फडकवण्यात आला. याप्रसंगी देश संरक्षणासाठी वापरण्यात येणार्या प्रतिकात्मक वाहनांचे संचलनही रोबोटिक्स यंत्रणेमार्फत करण्यात आले.
यावेळी सावंत म्हणाले, भविष्यकाळात या रोबोटिक विश्वाची मोठी गरज आहे. पुस्तकी ज्ञानाएवढेच महत्व प्रात्याक्षिक अनुभवी ज्ञानास आहे. हे तंत्रज्ञान घरोघरी पोहचविण्याची गरज आहे. सध्या औद्योगिक जगतातही या रोबोटिक्स यंत्रणेचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आलेला आहे. मी येरवडा, पुणे येथे जेलर म्हणून कार्यरत होतो. त्यावेळेस असलेल्या 6 हजार कैद्यांनी नुसतेच बसण्यापेक्षा त्यांच्या वेळेचा वापर करुन आम्ही बोलेरो या चारचाकी कंपनीसाठी हार्नेस्ट वायर बनविण्याचे प्रशिक्षण या कैद्यांना दिले. त्याची निर्मिती करुन रोजगारही उपलब्ध झाला. त्यातून कमाईही सुरु झाली. नगरच्या जेलमध्येही असा प्रयोग करण्याचा मानस आहे.
सेंंटरच्या संचालिका प्रियंका संकलेचा, निशा शाह यांनी सर्वांचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी प्रशिक्षक मनीष कुमार, सागर गडकर, अनमोल पाटील, प्रवीण बिराटे, मेघा अरगुंटला, ऐश्वर्या खताडे यांनी परिश्रम घेतले. प्रितेश संकलेचा यांनी आभार मानले.
रोबोटीक्स सेंटरच्या नगर व सावेडी शाखेमध्ये सुमारे 150 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.
No comments:
Post a Comment