नगर । प्रतिनिधी - शासनाचा कर वाचविण्यासाठी खोट्या पावत्या बनवून मुरुम घेऊन जाणार्या डंपरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रांताधिकारी श्रीमती उज्ज्वला गाडेकर व त्यांच्या पथकाच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न झाला. तसेच शिवीगाळ करुन अधिकार्यांना दगड फेकून मारण्यात आले. हा प्रकार काल (रविवार) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास औरंगाबाद रस्त्यावरील तपोवन महालाजवळील उदमले यांच्या साईटवर घडला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणी डंपरचालक साठे, हयात खान, दिलावर खान, अय्युब असीर पठाण, समीर पठाण, निसार पठाण, युसुफ पठाण, अज्जु व इतर 4 ते 5 जणांवर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लिपिक अशोक सूर्यभान मासाळ (वय 30, रा. पाईपलाईनरोड, सावेडी) यांच्या फिर्यादीवरुन भादंविक 307, 308, 379, 143, 147, 465, 468, 420, 353, 427, 504, 506, मुंबई पोलिस अधिनियम कलम 37 (1)(3), 135, महाराष्ट्र महसूल संहिता अधिनियम कलम 48 (7), (8) पर्यावरण कायदा कलम 8, 15 प्रमाणे तोफखाना पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपींनी लिपीक अशोक मासाळ यांचा मोबाईल हिसकावून रस्त्यावर आपटून फोडून नुकसान केले. महिला अधिकार्याच्या अंगावर डंपर घालण्याचा पयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे.तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील हे करत आहेत.
No comments:
Post a Comment