नगर । प्रतिनिधी - गर्भ मुलीचा असल्याने पूर्ण वाढ होण्यापूर्वी 27 आठवड्यांतच प्रसूती करण्यासाठी तिचे जन्मदाते आई-वडील कसाई बनले होते. तथापि अथक परिश्रमांनी बहुविध व्याधींनी ग्रस्त मातेचे आणि पवित्रा या बालिकेचे जीवन संरक्षित केले. पवित्रा हे नाव दिलेल्या या बालिकेला आज अमेरिकन पालकांना दत्तक देताना वैद्यकीय पेशाचे सार्थक झाले, असे मत डॉ. राजेंद्र आणि डॉ. हेमलता वैरागर यांनी व्यक्त केले.
लैंगिक भेदभाव, पूर्वग्रह, आरोग्यविषयक समस्या, सामाजिक आणि कायदेशीर अडचणींना तोंड देणार्या 8 बालकांना एका विशेष महादत्तक सोहळ्यात आई-बाबा आणि घर मिळाले. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राच्या केडगाव येथील सौ. रूपाली जयकुमार मुनोत बालकल्याण संकुलात हा महादत्तक विधान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हा न्यायाधीश सत्यनारायण नावंदर, साईदीप रुग्णालयाचे संस्थापक डॉ. एस. एस. दीपक आणि ज्योती दीपक, राहुरी येथील डॉ. हेमलता व डॉ. राजेंद्र वैरागर, मॅकॉक्स आणि श्रीमती जॉयस कोनोली, पत्रकार विजयसिंह होलम यांच्याहस्ते या बालकांचे दत्तकविधान करण्यात आले. यातील 5 बालके भारतातील तर 3 बालकांना परदेशातील पालकांना दत्तक देण्यात आले.
भारताच्या विविध प्रांतातील पाच सक्षम पालक स्नेहांकुरने आपल्या बाळांसाठी निवडले. 3 परदेशी पालकांपैकी दोन पालक माल्टा या देशातील असून एक अमेरिका येथून आले. यावेळी डॉ. राजेंद्र वैरागर म्हणाले, कोणीतरी संस्थेच्या दारात बालक आणून देते आणि संस्था ते दुसर्या पालकांना देते एवढे दत्तक विधान सोपे नाही. पवित्रा या मुलीचे जीवन संरक्षित करताना स्नेहांकुर संस्थेने आणि 24 तास राबणार्या कार्यकर्त्यांनी अनेक आव्हानात्मक मानसिक आणि कायदेशीर प्रश्नांना तोंड दिले.
दत्तू वैरागर म्हणाले, एका बालिकेचे रक्षण करून सक्षम परिवारात पोहोचविताना अनेकदा निराशेचा अनुभव आला. तथापि देशात सर्वाधिक दत्तक विधाने मागील तीन वर्षात स्नेहांकुरने केली. आजवर 800 बालकांना कुटुंब आणि भविष्य देणार्या स्नेहांकुर संस्थेच्या कार्यकर्त्यांना या प्रक्रियेत तणावग्रस्त झालेले कधीही पाहिले नाही. संकटग्रस्त बालकांसाठी जीवाची बाजी लावणारी अशी बालसेवा हीच भारताच्या भविष्याची आशा आहे.
डॉ. प्रिती भोंबे म्हणाल्या, हजारो अनाथ मुलांना पालक आणि घर देण्याचे अभियान स्नेहांकुर राबविते. त्याचाच एक भाग म्हणून दत्तक विधानाबद्दल व्यापक जनजागृती करण्यासाठी महादत्तक विधान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात एकूण 4 मुले आणि 4 मुलींचे दत्तक विधान झाले. यातील चार प्रकरणात स्नेहांकुर संस्था अत्याचारांबाबत कायदेशीर लढाई करीत आहे. या बालकांच्या मातांच्या सोबत स्नेहांकुर परिवाराने केलेले सक्षमीकरण आणि पुनर्वसनाचे काम कसे चालते याविषयी स्नेहालय परिवाराचे पालक मिलिंद कुलकर्णी यांनी माहिती दिली.
दत्तकविधान प्रक्रियेसंबंधी अधिक माहितीसाठी हेल्प लाईन 9011026483 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्काचे आवाहन स्नेहांकुरने केले आहे.
No comments:
Post a Comment