Tuesday, 29 January 2019

मेहेराबादला उद्यापासून अमरतिथी उत्सव


नगर । प्रतिनिधी - अरणगाव रस्त्यावरील मेहेराबाद येथे अवतार मेहेरबाबा यांच्या समाधीस्थळी 50 वी अमरतिथी (पुण्यतिथी) सोहळा उद्या, बुधवारपासून सुरु होत आहे. जगातील 74 देशांतून व भारतातील सर्व राज्यांतून सुमारे लाखाच्यावर मेहेरप्रेमी येणार असल्याचे गृहीत धरून नियोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. 30 जानेवारी ते शुक्रवार दि. 1 फेब्रुवारी या कालावधीत हा उत्सव होणार आहे.
मेहेरबाबांचे जगात असंख्य भक्त व केंद्रे आहेत. सर्व जाती-धर्मातील लोकांना मानवतेचा व सत्याचा संदेश देत त्यांनी जगभर प्रवास केला. जगात कोठेही मी देह सोडला तरी मेहेराबाद येथे बांधलेल्या समाधीत मला समाधिस्त करावे असे त्यांनी सांगून ठेवले होते. दि. 31 जानेवारी 1969 रोजी त्यांचे महानिर्वाण झाले म्हणून या ठिकाणी लाखो भाविक येतात.
परदेशातून मेहेरप्रेमी येण्यास सुरुवात झाली असून यामध्ये चीन, साऊथ कोरिया, अर्जेंटिना, अमेरिका, इराणच्या भाविकांचे जथ्थे आले आहेत.
दि. 30 रोजी सकाळी 6 वाजता मेहेरबाबा समाधी दर्शनाला प्रारंभ होऊन दुपारी 2 वाजता प्रेममिलन कार्यक्रमास आरती व प्रार्थनेने प्रारंभ होईल. नंतर देश-विदेशातील मेहेरप्रेमी भजने,गजल, नृत्ये, कव्वाली, गाणी, नाटिका सादर करतील. त्याच बरोबर बाबांवरील फिल्मही दाखवण्यात येतील. प्रेममिलन कार्यक्रम तीन दिवस सुरू राहील. दि. 31 रोजी सकाळी 7 वाजता दौंड रोडवरील बाबांची धुनी प्रज्वलित करण्यात येणार आहेे. सकाळी 11 वाजता अध्यक्ष श्रीधर केळकर हे उपस्थितांना संबोधित करतील. सकाळी 11.30 ला घोषणा सुरु होतील. 11.45 ला बिगिन दि बिगिन हे गाणे व 11. 50 ला मेहेरधून म्हटली जाईल. बाबांनी देहत्याग केला, त्यावेळी दुपारी 12 वाजेपासून  15 मिनिटे मौन पाळले जाईल.
शुक्रवार दि. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत प्रेममिलन कार्यक्रम, नंतर आरती व प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता होईल.

No comments:

Post a Comment