Wednesday, 30 January 2019

कृषी महोत्सवात 97 लाखांची उलाढाल


नगर । प्रतिनिधी - सध्या मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे. आपल्याकडे असलेले पीक कसे वाचवायचे? यासाठी धान्य महोत्सवाच्या माध्यमातून प्रात्यक्षिकांचे स्टॉल येथे लावण्यात आले होते. सगळ्या योजना शेतकर्‍यांना पाहता याव्यात, हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा महोत्सव आयोजित केला. दुष्काळात चारा कसा उपलब्ध होईल, याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. तसेच या 5 दिवसांच्या कालावधीत 97 लाखांची उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी दिली आहे.
प्रोफेसर कॉलनी चौकाजवळील जॉगिंग ट्रॅकच्या मैदानावर कृषी विभाग (आत्मा) च्या वतीने कृषी महोत्सवाचे दि.25 ते 29 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवास शहरासह जिल्ह्यातील ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काल, मंगळवारी या महोत्सवाचा समारोप झाला.
कृषी विभाग (आत्मा) आयोजित कृषी महोत्सवातील सहभागी स्टॉलधारक शेतकर्‍यांना सन्मानचिन्हांचे वितरण लोणारे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महोत्सवात खरेदी करणार्‍या ग्राहकांसाठी लकी ड्रॉ आयोजिण्यात आला होता. या लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवान ठरलेल्या एकूण 40 ग्राहकांना बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी उपसंचालक सुरेश जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी अधिकारी सुनील राठी, अनिल गवळी आदी उपस्थित होते.
या महोत्सवात गहू, ज्वारी, तांदूळ, कडधान्ये, गावरान गायीचे ताक, तूप, सर्व तेले, मध, भाजीपाला, फळे, गृहोपयोगी वस्तु अशी एकूण 97 लाखांची उलाढाल झाली. या ठिकाणी शिपी आमटी, थालपीठ, उसाचा रस आदींचाही अनेकांनी आस्वाद घेतला. 
समारोप प्रसंगी सहभागी स्टॉलधारक शेतकरी व बचतगटांना सन्मानचिन्ह देण्यात आले. महोत्सवात सादर झालेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा उपस्थितांनी आनंद घेतला. या महोत्सवाच्या मोठ्या संख्येने नगर शहराबरोबरच जिल्ह्यातील ग्राहकांनी भेट देऊन खरेदीचा आनंद घेतला. महोत्सव यशस्वीतेसाठी प्रवीण गोरे, कौस्तुभ कराळे, देवेंद्र जाधव, प्रकाश आहेर, नंदकुमार घोडके, धिरज कदम, अनिल औटी, श्रीकांत जावळे, तुषार कोल्हेकर, बाळनाथ सोनवणे, वैभव कानवडे, किशोर कडुस, सुजित गायकवाड, प्रशांत पुलाटे, प्रकाश महाजन, दानिश शेख, अनंत ढमाळ, प्रेरणा निंबाळकर, दीपाली दरेकर, नीलेश भागवत, सुनील म्हस्के, मीनाक्षी गोरे, संजय जाधव आदींनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment