नगर । प्रतिनिधी - मी ताकाला जाऊन भांडे लपवणारा माणूस नाही. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवणारच आणि का लढवणार याची भूमिका सातत्याने गेली तीन वर्षे लोकांसमोर मांडत आहे. अशावेळेस ज्यांना उमेदवारीचे स्वप्न पडत आहे ते आपले घर सोडायला तयार नाहीत. अशी माणसे ज्यांच्या अंगी कुठली कर्तबगारी नाही व पक्षाच्या कुबड्यावर अवलंबून आहेत ते वल्गना करत आहेत. परंतु यापूर्वी आपण अनेकवेळा स्पष्ट केले की मी लोकसभा निवडणूक सामान्य माणसाच्या पाठिंब्यावर, आशीर्वादावर लढवत आहे. त्यामुळे रोजंदारीवरचे पुढारी काय म्हणतात याकडे आपण लक्ष देत नाही. लोकसभा निवडणूक सन 1991 च्या इतिहासाची पुनरावृत्ती करेल, असा विश्वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.
डॉ. विखे यांचे शेवगाव तालुक्यातील निंबेनांदुर, वाघोली, ढोरजळगाव येथे कार्यकर्ता मेळावे झाले. या दौर्याची सांगता गरडवाडी येथे कार्यकर्ता सभा घेऊन केली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, अजय रक्ताटे, निंबेनांदुर, ढोरजळगाव, वाघुली, भातकुडगाव येथील ग्रामपंचायत पदाधिकारी, सेवा सोसायटीचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुजय विखे म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, अनेकांना उमेदवारीचे दिवास्वप्न पडत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी दोन महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिलेला आहे. अशावेळेस ज्यांना खरोखरच लोकसभा उमेदवारीच्या माध्यमातून जनसेवा करायची आहे, प्रश्न समजून घ्यायचे आहेत, अशी माणसे दोन महिन्यांमध्ये दक्षिण मतदार संघातल्या 700 पेक्षा जास्त गावांमध्ये व 70 पेक्षा जास्त गणांमध्ये पोहचू शकतील काय, असा खडा सवाल करत एवढ्या कमी कालावधीमध्ये मतदार संघामध्ये फिरणे, लोकांपर्यंत पोहोचणे केवळ अशक्य आहे. अशावेळेला भूछत्राप्रमाणे उगवलेले उमेदवार कुठल्यातरी नेत्याचे उंबरठे झिजवून आदेशाची याचना करतील. तुम्हाला कुठल्याही पुढार्यांचा आदेश आल्यानंतर त्यांनी दिलेल्या उमेदवाराचे कर्तुत्व, त्याची कर्तबगारी याची विचारणा करा व मगच मतदान करा. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. गेल्या सात वर्षांपासून मी सक्रिय राजकारणात आहे. दोन बंद पडलेले साखर कारखाने सभासदांनी अत्यंत विश्वासाने माझ्या ताब्यात दिले. स्व. बाळासाहेब विखे पाटील व कै. मारुतराव घुले पाटील यांनी पाहिलेले सहकाराचे स्वप्न जोपासण्याचे काम आपण अत्यंत प्रामाणिकपणे करत आहोत. मागील तीन वर्षात मी दक्षिणेतल्या 400 पेक्षा जास्त गावांना भेटी दिल्या, 29 आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून 57 हजार पेक्षा जास्त रुग्णांची आरोग्यसेवा करण्याचे भाग्य मला लाभले.
डॉ. विखे पुढे म्हणाले, शेवगाव-पाथर्डीचे अनेक प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहेत. या मतदारसंघाची रचना त्याला काहीअंशी कारणीभूत आहे. त्यामुळे या मतदारसंघाला खासदाराची जास्त आवश्यकता आहे. लोकसभा निवडणुकीत साहेबांचा आदेश आला तर प्रथम आपल्या पुढार्यांना त्यांनी सुचवलेल्या, सांगितलेल्या उमेदवाराची कर्तबगारी व असा उमेदवार आपल्यासाठी काय करू शकतो हा विचार करून आपले मतदान करावे. मागील पंधरा वर्षांपासून खासदार साहेबांचा चेहरा पण बघितला नाही, त्या खासदारांना आपण बिनबोभाटपणे इतके दिवस मतदान केले. परंतु आता या खासदार साहेबांना फुरसत मिळाल्यानंतर आपण आमच्यासाठी काय केले, असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. येणारी निवडणूक ही अस्तित्वाची आहे. त्यामुळे आपण कुठल्याही दबावाला बळी न पडता सारासार विचार करून योग्य उमेदवार निवडावा असे आव्हान डॉ. विखे यांनी उपस्थितांना केले.
No comments:
Post a Comment