नगर । प्रतिनिधी - लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी व शेतकर्यांच्या मालाला दीडपट हमीभाव मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून (बुधवार) राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे उपोषण सुरू केले आहे. उपोषणस्थळी उपस्थितांना संबोधित करताना अण्णांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकावर जोरदार टीका केली. या सरकारला भ्रष्टाचारमुक्त देश नको आहे. त्यामुळेच लोकपाल कायदा लागू केला जात नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
राळेगणमधील यादव महाराज समाधी मंदिरासमोर अण्णांनी उपोषण ंसुरू केले आहे. विद्यार्थ्यांसह शेतकर्यांनीही अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रीय किसान महासभेनेही दिल्लीतील जंतरमंतरवर अण्णांच्या मागण्यांना पाठिंबा देत उपोषण सुरू केले आहे. उपोषण सुरू केल्यानंतर पहिल्याच भाषणात अण्णांनी भाजप सरकारवर तोफ डागली. हे सरकार आंधळं आणि बहिरं आहे. त्यांना शेतकर्यांचे हाल दिसत नाहीत. त्यांचा टाहो ऐकायला येत नाही. या सरकारला केवळ उद्योगपतींची चिंता आहे. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या आश्वासनाचा सरकारला विसर पडला आहे, असे अण्णा म्हणाले.
दरम्यान आंदोलन मागे घेण्याची सरकारची विनंती अण्णांनी फेटाळली आहे. अण्णांच्या भेटीसाठी निघालेल्या गिरीश महाजनांचा यामुळे हिरमोड झाला आहे. महाजन हेलिकॉप्टरमधून उतरून मुंबईतील जुहू ऐरोड्रोमवरून परतले आहेत. वय आणि तब्येतीचा विचार करता आंदोलन मागे घेण्याची विनंती गिरीश महाजन यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment