Thursday, 24 January 2019

बेघर वंचित बहुजनांना घरकुले मिळण्यासाठी धरणे


नगर । प्रतिनिधी - शासनाकडे वेळोवेळी मागणी करून बेघर, वंचित, निराधार बहुजनांना घरकुले मिळालेली नाहीत. यासाठी आम्ही वारंवार मोर्चे काढून उपोषण केले आहे. मात्र, त्याची अद्यापपर्यंत शासनाने दखल घेतलेली नाही. यासाठी आम्ही पुन्हा एकदा धरणे आंदोलन करून उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. भूमिहीन, आदिवासी, रामोशी, दलिनत यांना अनेक वर्षांपासून शासनाच्या घरकुल योजनेपासून वंचित ठेवून धनदांडग्यांना घरकुल योजनेचा लाभ घेतला आहे. जे खरोखर लाभार्थी आहेत, त्यांना गावातील राजकारणी लोक ग्रामसेवकांना हाताशी धरून शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित ठेवत आहेत, असे आरोप झुंबर माळी यांनी केला आहे.
बेघर वंचित बहुजनांना घरकुल मिळण्यासाठी किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करून धरणे आंदोलन करून तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी झुंबर माळी बोलत होते. 
या आंदोलनात झुंबर माळी, पोपट चव्हाण, बन्सी पाठक, कचरू वाघमारे, नामदेव वाघमारे, आबा वाघमारे, बबन जाधव, दामोदर वाघमारे, गोकुळ बडे, बाबासाहेब पालवे, रामदास चौथे, छाया माळी, सुनीता माळी, शारदा बर्डे, कौसाबाई बर्डे, सुरेखा चव्हाण आदी सहभागी झाले होते.
किसन चव्हाण यावेळी म्हणाले की, बेघर, भूमिहीन, आदिवासी, रामोशी, दलित यांना घरकुले उपलब्ध करून देऊन त्यांना पिवळे रेशनकार्ड द्यावे. पिण्याचे पाणी वाड्यावस्त्यांपर्यंत न्यावे. निराधार महिलांना 2 रुपये किलोप्रमाणे गहू, तांदूळ मिळावा. आदिवासी मुलांना मोफत सायकली उपलब्ध करून द्याव्यात. वाड्यावस्त्यांवर बोअर घेऊन तेथे हातपंप बसवावेत. व्यवसायासाठी शेळीपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन यासारखे योजनांचा लाभ मिळवून द्यावा, यासह आमच्या इतर अनेक मागण्या असून, त्याची पूर्तता करावी, असे यावेळी ते म्हणाले.

No comments:

Post a Comment