नगर । प्रतिनिधी - शहरातील दातरंगे मळा येथील अविनाश पेंडम या तरूणाचे बनावट फोन कॉल्सव्दारे बँकेतून गेलेले पैसे सायबर क्राईम पोलिसांनी परत मिळवून दिले. याबद्दल पेंडम यांनी सायबर क्राईम पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांचा सत्कार केला.
यावेळी मिलिंद गुंजाळ, पोलिस अधिकारी वैभव महांगरे, ऋषिकेश सामल, सचिन चैाधरी आदी उपस्थित होते.
अविनाश पेंडम यांना दि. 11 जानेवारी 2019 रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास 8167852008 या नंबरवरुन एक फोन आला. युनियन बँकेमध्ये मॅनेजर बोलतोय, असे सांगून या व्यक्तीने एटीएम कार्डची माहिती विचारली. त्यानंतर अविनाशच्या आय.डी.बी.आय खात्यातून 48 हजार 899 रुपये परस्पर काढण्यात आले.
त्यांनी आयडीबीआय बँकेच्या मॅनेजरकडे संपर्क करुन बँकेचे खाते बंद केले. तसेच सायबर क्राईम पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. पोलिस निरिक्षक बाळकृष्ण कदम, पोलिस कॉन्स्टेबल अरुण सांगळे, हेडकॉन्स्टेबल उमेश खेडकर, पोलिस नाईक विशाल अमृते, पोलिस नाईक रावसाहेब हुसळे यांनी तातडीने कारवाई करुन अविनाश पेंडम यांच्या बँक खात्यातून गेलेले पैसे परत त्याच खात्यात जाम करुन दिले.
दरम्यान, अशा फसव्या कॉल्सपासून नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन सायबर क्राईम पोलिस स्टेशनच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment