Tuesday, 29 January 2019

डेंटल क्लिनीक बोगसच


नगर । प्रतिनिधी - शहरातील सावेडी उपनगरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या एक डेंटल क्लिनिक जिल्हा शल्य चिकित्सक व पोलिसांच्या संयुक्त पथकाने सोमवारी रात्री उशिरा सील केले. मात्र, त्यादरम्यान एकही डॉक्टर त्यांच्या हाती लागला नाही. शल्य चिकित्सकांनी दोन डॉक्टरांची चौकशी केली असता आम्ही भेट देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो अशी उत्तर देऊन त्यांनी स्वत:ची सुटका करून घेतली. परंतु हे डेंटल क्लिनीक आहे की लॅब याची चौकशी केली असता अनधिकृत असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे डॉ.संदीप बुळवे यांनी सुरू केलेले डेंटल क्लिनीक व स्वयंघोषित लॅब चौकशीच्या फेर्‍यात अडकली असून लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. असा प्रकार शहरात इतरत्रही सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही असेही शल्य चिकित्सक मुरंबीकर यांनी सांगितले. या सर्व प्रकाराची गंभीर चौकशी झाल्यास बोगस डॉक्टरांचे रॅकेट हाती लागण्याची शक्यता आहे. सविस्तर माहिती अशी की, शहरातील सावेडी उपनगरातील एका इमारतीत डेंटल क्लिनिक सुरू आहे. या क्लिनिकमध्ये ज्या डॉक्टरांची नावे नमूद आहेत, ते डॉक्टर न थांबता, पदवी नसलेला डॉक्टर वैद्यकीय उपचार करतो, अशी माहिती समजली होती. त्यावरून जिल्हा शल्य चिकित्सक, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे आदींच्या पथकाने सोमवारी रात्री उशिरा डेंटल क्लिनीकवर छापा टाकला.  मात्र, पोलीस येण्यापूर्वीच रूग्णालय चालविणारा डॉक्टर संदीप बुळवे पसार झाला होता.
डेंटल क्लिनीकमध्ये ज्या डॉक्टरांची नावे व पदवी लिहिलेली आहे, अशा डॉक्टरांना बोलावून घेण्यात आले. रूग्णालयात लावलेल्या डॉक्टरांचे पदवी प्रमाणपत्र ताब्यात घेण्यात आले. पोलिस व वैद्यकीय अधिकार्‍यांनी पंचनामा करून क्लिनिक सील केले. मध्यरात्रीपर्यंत पोलिसांची ही कारवाई सुरू होती. रूग्णालयात नावे लिहिलेल्या डॉक्टरांच्या पदव्यांची चौकशी होणार आहे. 
याबाबत चौकशी करून लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक मुरंबीकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment