Monday, 28 January 2019

भाजपचा गड आला पण सिंह गेला!


नगर । प्रतिनिधी - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजयी घोडदौड कायम राखत भारतीय जनता पक्षाने आज, सोमवारी श्रीगोंदा नगरपालिकेवरही वर्चस्व मिळविले आहे. एकूण 19 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने 11 जागा जिंकत काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव केला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला आठ जागांवर समाधान मानावे लागले. मात्र, नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी पोटे यांचा विजय झाला. त्यामुळे भाजपचा गड आला पण सिंह गेल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये काहीसी नाराजी दिसून आली. तर त्यांचे आघाडीचे विरोधकांना आठ जागांवर समाधान मानावे लागले असले तरी त्यांनी जंगी मिरवणुक काढून नगराध्यक्ष पदाची जल्लोष केला.  
श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते. आज मतमोजणी पार पडली. बहुमतासाठी 10 जागांची आवश्यकता होती. भाजपने बहुमतापेक्षा एक जागा जास्त जिंकत नगरपालिकेवर वर्चस्व मिळविले. मात्र, भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता शिंदे यांचा तब्बल दीड हजार मतांनी पराभव झाला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार पोटे यांनी त्यांचा पराभव केला. पोटे या पूर्वी भाजपमध्येच होत्या. मात्र, ऐनवेळी पक्षांतर करून त्यांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवली होती. शिवसेना-भाजपने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढली होती. शिवसेनेने काही जागा लढवल्या होत्या. मात्र, त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.

No comments:

Post a Comment