नगर । प्रतिनिधी - शृंगेरी पीठाधीश्वर शंकराचार्य श्रीश्रीश्री विधुशेखरभारती स्वामींच्या सान्निध्यात येथील वेदांत विद्यापीठामध्ये श्रीदत्त वाक्यार्थ सभेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. भारतभरातून आलेल्या संस्कृतच्या विद्वानांची या सभेस लक्षणीय उपस्थिती असून सलग तीन दिवस ही सभा चालणार आहे.
सभेचा शुभारंभ वैदिक मंगलाचरणाने करण्यात आला. पंडित देवदत्तशास्त्री पाटील (गोवा) यांनी प्रास्ताविक करताना या सभेचे प्रयोजन सांगितले. शंकराचार्य स्वामींच्या शास्त्रार्थाने सभा सुरू झाली. शंकराचार्य स्वामी न्यायशास्त्रामधील अनुमानप्रमाणासंबंधी सूक्ष्म विचार मांडताना म्हणाले, जेव्हा अनुमान प्रमाणाचा विचार केला जातो तेव्हा सर्वप्रथम संशय समोर येतो. या संशयालाच पक्षता असे म्हणतात. गंगेशोपाध्यायांनी लिहिलेल्या चिंतामणी संज्ञक ग्रंथामध्ये याबाबत सखोल चिंतन केलेले आहे. संशयाचे अनेक प्रकार असून ते सर्व प्रकार जाणून घेण्याचा मार्ग शंकराचार्य स्वामींनी विशद केला.पंडित के. ई. देवनाथन् (तिरूपती) यांनी पूर्वमीमांसाशास्त्राआधारे दर्शपूर्णमास यज्ञासंबंधी विस्तृत विवेचन केले. पंडित के. एस. महेश्वरन् (चेन्नई) यांनी वेदान्त शास्त्रातील उपनिषदांमधील वाक्यांचा अर्थ लावताना काय-काय अडचणी येतात, हे सोदाहरण सांगताना अडचणी सोडविण्याचे उपाय सांगितले. पंडित श्रीपाद सुब्रह्मण्यम् (हैद्राबाद) यांनी न्यायशास्त्रामध्ये अनुमान प्रमाणाचा विचार करताना निर्माण होणारे दोष समजून घेण्याचा सांगितलेला मार्ग निवेदन केला. पंडित आर. मणीकंठ घनपाठी (त्रिची-तामिळनाडू) यांनी वेदातील काही शब्द व्याकरण शास्त्राच्यादृष्टीने कसे योग्य आहेत, हे दाखवून दिले.
व्यवहारात नित्य उपयोगी असलेल्या अनेक बाबींचे मूलाधार शास्त्रच आहे. या शास्त्रासंदर्भात विस्तृत ऊहापोह दिवसभरातील सत्रांमध्ये करण्यात आला. विचार करण्याची प्रक्रिया कशी सुरू होते? विचार करताना आलेल्या अडचणी सोडवण्याचे मार्ग कोणते आहेत? संशयाचे स्वरूप समजावून घेऊन त्यावर तोडगा कसा काढावा? यासह मानसिक उन्नती वाढवणार्या विषयांवर विद्वान पंडितांनी प्रकाश टाकला.
No comments:
Post a Comment