नगर । प्रतिनिधी - ही भूमी आपल्याला सर्वकाही देते. पण आपण त्याचा सुयोग्य असा वापर करुन त्या भूमातेचे नुकसान होईल असे काहीही करु नये. पूर्वी गंगा नदीचे पाणी हे जसेच्या तसे पिण्यासाठी वापरत असत. पण आज त्यामध्ये प्रदुषण झालेले आपणांस दिसते. म्हणूनच शासन गंगा स्वच्छ करण्यासाठीचे बर्याच प्रोजक्टसवर काम करत आहे. नैसर्गिक संसाधनांचा आपण योग्य तो विनीयोग केला तरच पर्यावरणाशी समतोल साधून आपण आपला विकास करु शकतो, असे प्रतिपादन एन. आय. टी. आय. ई. मुंबईचे डॉ. शंकर मूर्ती यांनी केले.
येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आणि अंतर्गत गुणवत्ता सिध्दता कक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने काल (बुधवार) व आज (शुक्रवार) एकविसाव्या शतकातील पर्यावरण आव्हाने या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जळगावच्या एस.एस.बी.टी. चे डॉ. मुजाहिद हुसेन, एस.व्ही.एन.आय.टी. सूरतचे डॉ. के. डी. यादव, पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. संदीप माळी, एस. सी. ओ. ई. पुण्याचे डॉ. समीर शास्त्री यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. मुजाहिद हुसेन म्हणाले, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी घोषित केल्याप्रमाणे 20 व्या शतकात सायन्स व टेक्नॉलॉजीमध्ये भरीव प्रगती होत आहे. परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे व वाढत्या प्रदूषणामुळे आपल्याला वातावरणामध्ये बदल झाल्याचे चित्र दिसत आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश न करता आपला विकास साधता आला पाहिजे. यासाठी स्थापत्य अभियंत्यांना यापुढे या आव्हानांना तोंड देण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे.
या राष्ट्रस्तरीय चर्चासत्रासाठी भारतातून वेगवेगळ्या ठिकाणाहून 55 अभियंते व विद्यार्थी आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन विभागप्रमुख डॉ. उर्मिला कवडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. मंदार गुंजाळ, प्रा. सूरज असावा, उपसंचालक प्रा. सुनील कल्हापुरे, प्राचार्य डॉ. उदय पी. नाईक यांच्या मार्गदशनाखाली करण्यात आले होते.
No comments:
Post a Comment